गावागावात असलेल्या सार्वजनिक मंडळांच्या सदस्यांची एकगठ्ठा मते मिळावीत याकरिता उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याकरिता मंडळाचे सदस्य असलेल्यांची मतदार यादीतील नावे तपासून उमेदवाराच्या प्रतिनिधींकडून मंडळांना देणगी देण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंडळांना भरघोस निधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीत मतदारांना वश करण्यासाठी उमेदवारांकडून विविध प्रकारच्या कल्पना राबविल्या जात आहेत. यामध्ये सध्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच कला, क्रीडा या माध्यमातून गावागावांतून तसेच शहरातूनही तरुणांची मंडळे स्थापन झालेली आहेत.
या मंडळांना निवडणुकीच्या काळात सुगीचे दिवस येत आहेत. निवडणुकीत उमेदवारांना मतदान करण्यासाठी युवक मंडळांकडून मागणी केली जाते. दुसरीकडे सध्या विविध पक्षांकडून अशा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू असून निधीसंदर्भात चर्चा झडू लागल्या आहेत.
अनेक ठिकाणी निवडणुकीपूर्वीच आश्वासने देण्यात आल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका युवक मंडळाच्या अध्यक्षाने दिली आहे. दरवर्षी आम्ही देणगीसाठी या नेत्यांकडे जातो मात्र निवडणुकीमुळे नेते आणि त्यांचे प्रतिनिधी आमच्याकडे येऊ लागल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मात्र या मंडळांना सर्वच उमेदवारांकडून ऑफर येऊ लागल्याने मंडळांकडून कोणत्या उमेदवाराला मतदान होणार ते त्यांच्याकडून मिळणाऱ्या देणगीच्या स्वरूपावरच ठरण्याची शक्यता आहे.