नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात काही ठिकाणी बोगस मतदानावरून, तर काही ठिकाणी मतदार यादीत नावे नसल्यामुळे झालेली हमरीतुमरी वगळता वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात शांततेत मतदान पार पडले. मतदानास आलेल्या मतदारांची काळजी घेण्यासाठी उमेदवारांची लगबग या वेळी पाहण्यास मिळाली. बाहेर उन्हाचा कडाका असूनही मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने मतदार केंद्र मार्गावर त्यांच्यासाठी थंड पेय, लस्सी, बिर्याणी आदी खाद्यपदार्थाची उमेदवारांकडून सोय करण्यात आली होती. काही मतदारांसाठी वाहनांचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती.
वाशी हे नवी मुंबईतील शहरांचे नाक समजले जाते. या शहरामध्ये अनेक मतदार हे सुशिक्षित व व्यापारी आहेत. या वर्गातील काही मतदारांनी अपेक्षापूर्वक मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे सक्रिय कार्यकर्ते जोपर्यंत वैयक्तिक भेटीला येत नाहीत तोपर्यंत मतदानाला इमारतीखाली उतरणार नाही अशी भूमिका काही मतदारांनी घेतल्याने खासगी कार्यकर्त्यांची एक फळी या मतदारांच्या भेटीसाठी दारोदार हिंडत होती. सानपाडा येथील प्रभाग क्रमांक ७६ व ७९ येथील एकूण १६ हजार मतदारांसाठी संबंधित राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोसायटय़ांच्या प्रतिनिधींकडे जबाबदारी दिली होती. गृहनिर्माण सोसायटय़ांच्या प्रवेशद्वारावरच मतदारांच्या नावाच्या स्लिप मिळण्याची सोय या राजकीय पक्षांनी केली होती. बुधवार हा एकच दिवस मतदार राजाच्या वाटय़ाला असल्याने रोज दुर्लक्षित होणारा या मतदार राजाच्या दिमतीला आज सोसायटय़ांचे अध्यक्ष व सचिव असल्याचे पाहायला मिळाले. वाशी गावामध्ये काँग्रेसचे दशरथ भगत यांनी मतदारांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तुर्भे गावात माथाडींच्या वस्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे हे डी. आर. पाटील कुटुंबीयांतील उमेदवारांसाठी मतदारांना त्यांचा हक्क बजावण्याचे आवाहन करीत होते.
वाशी शहरातील काही सुशिक्षित नागरिकांनी मतदानाचा हक्क सकाळीच बजावल्याने दुपारी मतदान केंद्रांवरील गर्दीचे प्रमाण कमी दिसले. याला उन्हाच्या झळा कारणीभूत होत्या. वाशी गावातील परिस्थिती ही निराळी होती. गावातील ग्रामीण पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी लस्सीपासून बिर्याणीपर्यंत सोय करण्यात आली होती. गावातील पालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधी स्मिता पाटील यांनी एका मतदारावर बोगस मतदानाचा संशय घेतल्यामुळे दोन गटांत हमरीतुमरी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तंटा टळला. मात्र काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. वाशी, सानपाडा या काही प्रभागांत विधानसभेला मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांची नावे या वेळी पालिका निवडणुकीच्या यादीतून वगळल्याने त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करताना पाहायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक मतदारांनी नेहमीप्रमाणे आपला लोकशाहीचा हक्क बजावला, तर काहींनी ‘वोट फॉर नोट’ची वाट पाहून आपला दीड हजारांवरचा दर सरसकट पाच हजारांवर नेल्याचे सांगण्यात येते. उमेदवारांनी जेवढी मतदारांची काळजी घेतली तेवढीच काळजी त्यांच्या मतांसाठी पाठपुरावा करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घेतल्याचे दुपारच्या चिकन बिर्याणीच्या पाकिटांवरून दिसली. या वेळी उन्हाच्या चटक्यात पोलिसांनीही या जेवणाचा आस्वाद घेतला. बोगस मतदान आणि पैसेवाटपाचे तुरळक प्रकार वगळता कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

संतोष सावंत, पनवेल</strong>

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates manage vehicle for voters convenience
First published on: 23-04-2015 at 12:03 IST