लैंगिक छळणुकीचा आरोप असलेले प्राचार्य अनेकदा नोटीस मिळूनही सुनावणीला हजर राहणे टाळत असल्यानेच या प्रकरणाची चौकशी पुढे सरकत नसल्याची माहिती मिळाली आहे.
सावनेर येथील डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र जुमळे यांच्याविरुद्ध त्याच महाविद्यालयातील एका सहायक प्राध्यापिकेने लैंगिक छळणुकीची तक्रार केली आहे. अनेकदा नोटीस मिळूनही ते महिला सेलसमोर सुनावणीसाठी हजर राहात नसल्यामुळे अहवाल तयार करण्यात उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्राचार्य जुमळे हे एकदाच सुनावणीसाठी महिला सेलपुढे हजर झाले व त्यानंतर अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही त्यांनी सुनावणी टाळली, असे महिला सेलच्या सचिव नीलिमा देशमुख यांनी सांगितले. मला नोटीस मिळालेली नाही असे कारण ते सांगतात. त्याच गावात राहणाऱ्या तक्रारकर्त्यां महिलेला त्याच दिवशी नोटीस मिळत असताना आरोपीला ती मिळत नाही, असे कसे शक्य आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रत्यक्षात प्राचार्यानाही त्याच दिवशी नोटीस मिळाल्याचा पुरावा संबंधित महिलेने माहिती अधिकार कायद्याखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे दिला होता. सुनावणीच्या तारखेच्या आठवडाभर आधी माझ्या सहायकाने या प्राचार्याना फोन केला होता. मात्र आपल्याला नोटीस न मिळाल्यामुळे आपण सुनावणीला हजर राहणार नाही असेच ते सांगत राहिले. ‘सुनावणीला केवळ त्यांच्यामुळे उशीर होत आहे. त्यांनी साक्ष दिल्याशिवाय आम्ही या प्रकरणी अहवाल तयार करू शकत नाही. शिवाय आमच्या सेलचे काही डॉक्टर सदस्य चंद्रपूरसारख्या दूरच्या ठिकाणावरून येतात आणि त्यांच्या तारखा निश्चित करणे कठीण काम असते. दुसऱ्या बाजूला, तक्रारकर्ती महिला सुनावणीसाठी नियमितपणे हजर असते’, अशी माहिती अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशमुख यांनी दिली. महिला सेलचे दोन सदस्य- पोलीस आयुक्त आणि उच्च शिक्षण उपसंचालक- देखील सुनावणीला हजर राहात नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
आपण महिला सेलसमोर सुनावणीसाठी दोन्ही वेळा हजर होतो, असे सांगून जुमळे यांनी त्यांच्यावरील आरोप ठामपणे नाकारले. ‘मी दोन्हीवेळा हजर असल्याबाबत त्यांनी रेकॉर्ड तपासून पाहायला हवा. तिसऱ्या सुनावणीची नोटीस उशिरा मिळाल्यामुळे मी जाऊ शकलो नाही.
पहिल्या वेळेस सेलच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला असल्यामुळे काही कामकाज झाले नाही. दुसऱ्या सुनावणीतही काहीच घडले नाही. मी दोषी नसताना सुनावणी कशाला टाळू?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. न्यायालयातही याच मुद्यावर सुनावणी सुरू असून मी तेथे नियमितपणे हजर राहातो, असे त्यांनी सांगितले.