अवसायनात निघालेल्या दि राजवाडे पीपल्स को-ऑप बँकेतून घेतलेल्या ७५ लाख रूपयांचे कर्ज व व्याजाच्या रकमेतून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून येथील माजी महापौर भगवान करनकाळ यांच्यासह त्यांचे बंधू, आई व बँकेच्या तत्कालीन दोन अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राजवाडे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पुंजाराम दुसाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भगवान करनकाळ यांनी अवसायनात निघण्यापूर्वी राजवाडे सहकारी बँकेतून व्यवसायासाठी २५ लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. कर्जापोटी नंदाणे खुर्द शिवारातील मिळकत त्यांनी तारण ठेवली. या मिळकतीचे कब्जेदार मालक निरंजन करनकाळ व शांताबाई करनकाळ आहेत. असे असताना बँकेला पूर्वसूचना न देताच किंवा संमती न घेता कर्जापोटी ठेवलेली ही मिळकत परस्पर विक्री केली.
बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ शंकर अग्रवाल व तत्कालीन कर्ज विभाग प्रमुख शाखाधिकारी पांडूरंग गोविंद देवरे यांनी बँकेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने फसवणूक केली. रिझव्‍‌र्ह बँकेचे व सहकार आयुक्त यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई न करता भगवान, निरंजन व शांताबाई करनकाळ यांना बेकायदेशीरपणे मदत केली. संगनमताने ७५ लाखाचा हा व्यवहार झाला. या प्रकरणी प्रथम महापौर करनकाळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.