माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार यांच्याविरद्ध सुनेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा रेहानविरुद्ध विवाहितेचा छळ व बलात्कार असा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असली तरी अद्याप केवळ रेहान यास अटक करण्यात आली आहे.
रेहान सालार याने फेब्रुवारी २०१२ ते जानेवारी १३ या कालावधीत पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवीत जळगाव शहरातील तिच्या घरी व मुंबई येथे बहिणीच्या घरी शरीरसंबंध ठेवले. नंतर त्याने त्या तरुणीशी लग्न केले. लग्न झाल्यावर आईचे घर विकून ५० लाख रुपयांची मागणी केली. ती पूर्ण न केल्याने मानसिक व शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पीडित तरुणीने येथील शनिपेठ पोलिसांमध्ये दिली. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, करिम सालार, मुलगा रेहान, सासू रुखसानाबी, जेठ इरफान, जावेद व चुलत सासरा अजित ऊर्फ बिट्टू सालार यांना संशयित आरोपी करण्यात आले आहे.