दिल्लीतील घटनेची किनारही
गत आठवणींना उजाळा देत अन् नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत नगरकरांनी आज जल्लोषात नववर्षांचे स्वागत केले. आगामी वर्षांसाठी काही संकल्पही केले. जल्लोषाचे वातावरण रात्री उशिरापर्यंत होते. त्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शहरात फटाकेही फोडण्यात आले. दिल्लीतील भीषण अत्याचाराच्या घटनेची कटुता अद्याप अनेकांच्या मनात कायम असल्याने काही ठिकाणी नव्या वर्षांच्या उत्सवी वातावरणास फाटाही दिला गेला.
नवीन वर्षांचे स्वागत कशा पद्धतीने करायचे याची कल्पना गेल्या आठवडापासूनच अनेकांच्या मनात रुंजी घालत होती. यासाठी तरुण-तरुणींच्या गप्पाही रंगत होत्या. कॉलेजमध्येही याचीच चर्चा होती, बेत रचले गेले, ते आज तडीस नेण्यात आले. तरुणाईच्या या उत्साहास आवर घालण्यासाठी पोलिसांनाही रात्र जागवावी लागली. प्रमुख रस्त्यांवर व शहराबाहेर जाणाऱ्या चौकांत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, गस्तही वाढवण्यात आली होती.
नव्या वर्षांचे स्वागत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करायची संकल्पना गेल्या काही वर्षांत युवक वर्गात वाढीस लागली आहे. त्याबद्दल ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजीची भावना आहे. तरुणांमधील ही क्रेझ आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकही तयार होते. त्यांची दालनेही सजवली गेली होती. भेटकार्ड, गिफ्टस् यांची खरेदीही होती. मोबाईलवर एसएमएस पाठवून शुभेच्छाही दिल्या जात होत्या. मात्र मोबाईल कंपन्यांनी सवलतीच्या दरातील एसएमएसला कात्री लावून ग्राहकांचे खिसे कापल्याने नाराजीही व्यक्त झाली.
काही हॉटेल, क्लब्ज, कंपन्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले होते. त्यांनी परवानगी काढली का, कर भरला का याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकामार्फत सायंकाळपासूनच सुरु करण्यात आली होती. सायंकाळनंतर हॉटेलमधून गर्दी झाली होती. मद्याच्या धुंदीत नव्या वर्षांचे स्वागत करण्यास काहींनी पसंती दिली, तर काही प्रमाणात घराघरातून टीव्हीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंदही सहकुटूंब लुटला गेला. शहरातील चौकांत तरुण मंडळांनी डीजे लावून तरुणाई त्यावर थिरकण्याची व्यवस्था केली होती. उपनगरातील कॉलनींमधील रहिवाशांनी एकत्रित उपक्रमही साजरे केले.