‘जेएनएनयूआरएम’ योजना सुरू झाली तेव्हा २०११ ची जनगणना झाली नव्हती. परंतु २०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहर ‘जेएनएनयूआरएम २’ साठी पात्र ठरले आहे. त्याचा प्राधान्यक्रमाने विचार केला जाणार असल्याचे केंद्रीय शहर विकासमंत्री कमलनाथ यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
योजना सुरू होताना १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहराचा यात समावेश झाला नव्हता. गेल्या वेळी ६३ शहरे या योजनेत समाविष्ट केली होती. सन २०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहराची लोकसंख्या १० लाखांपेक्षा जास्त असून जेएनएनयूआरएम २ योजनेत औरंगाबादचा समावेश करावा, अशी मागणी खैरे यांनी बुधवारी लोकसभेत केली. योजनेचा कार्यकाळ सन २०१४ पर्यंत आहे.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी व जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. सध्या महापालिकेकडून या बाबत प्रकल्प सादर करण्यात येत आहे. ड्रेनेज, मलनि:सारण, घनकचरा व रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. ‘यूआरडीएसएसएमटी’ मधून पाणीपुरवठय़ाचा प्रकल्प सुरू केला. अशा पद्धतीचा सर्वात पहिला प्रकल्प शहरात होऊ घातला आहे. ‘जेएनएनयूआरएम २’ मध्ये औरंगाबाद शहराचा समावेश झाला, तर पर्यटनाची मोठी राजधानी म्हणून विकसीत होऊ शकते, असे खैरे यांनी पत्रकात म्हटले आहे.