ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास, मूल येथे प्रस्तावित कृषी विद्यापीठ, बाबुपेठ उड्डाणपूल, रामाळा, मूल व बाम्हणी तलाव, झरपट नदी सौंदर्यीकरणाचा अर्थसंकल्पीय भाषणात समावेश करण्यासाठीचे नियोजन तात्काळ सादर करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्याची १०६ कोटींची अतिरिक्त मागणी असून ५० कोटींची मागणी मंजूर करण्याबाबत सहमती दर्शवली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली २०१५-१६ च्या चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. सभेला ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग, आमदार शोभा फडणवीस, नाना शामकुळे, पालक सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे उपस्थित होते. चंद्रपूर शहर विकास आराखडा तयार केला. आता बल्लारपूरचा तात्काळ तयार करा, अशा सूचना दिल्या. वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियोजन, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी आराखडा, रोजगार निर्मितीत मेक इन चंद्रपूर यावर प्राधान्याने भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ताडोबा विकासासोबतच वनौषधी, बांबू प्रक्रिया, राईस क्लस्टर, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कृषी विद्यापीठ, शिंगाडा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न, अद्ययावत वन अकादमीचा आराखडा तयार करण्याचेही निर्देश दिले.
ग्रामीण भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत प्रस्तावित करावे, वनहक्क पट्टे वाटपाबाबत नियोजन तयार करावे, अशा सूचना देऊन राजुरा येथे कॉटन बेस काय सुरू करता येईल, यासाठी नियोजन करावे, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी विकासासाठी वैशिष्टय़पूर्ण योजना तयार कराव्यात. जिल्हा नियोजन समितीने १११ कोटी ६६ लाखाचा आराखडा मंजूर केला असून १५१ कोटींची अतिरिक्त मागणी आहे. प्रायोगिक तत्वावर ३० गावांचा र्सवकष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यात शाळा, अंगणवाडी, वृक्ष लागवड, बांबू लागवड, रस्ते, वीज, पाणी व ग्राम पंचायत इमारत आदींचा समावेश असावा, रोजगार निर्मितीसाठी विशेष योजना काय आहेत, हे कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.