नांदगाव तालुक्यातील विविध प्रश्नांकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या विरोधात आता छावा (मराठा संघटन) ही संघटना मैदानात उतरली असून मनमाड-मालेगाव रोड चौफुलीवर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
मनमाडच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी, तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महसूल विभागाने चुकीचा अहवाल दिल्याने नाशिक जिल्ह्य़ात अद्याप दुष्काळ जाहीर होऊ शकलेला नाही. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप यावेळी विविध वक्त्यांनी केला. नांदगावचे नायब तहसीलदार पी. आर. वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात मनमाडचा पाणीप्रश्न त्वरित सोडवून अन्यायकारक भारनियमन रद्द करावे, अनेक भागात दुष्काळी सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने वास्तव आणेवारी जाहीर करावी, वीज देयक माफ करून पाण्याचे टँकर वाढवावेत, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुनील गुंजाळ, संपर्क प्रमुख संजय नाठे आदी उपस्थित होते.