जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला पण अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी मात्र करण्यात आली नसल्यामुळे नव्या वर्षांत नागपूर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ड्रेस कोडसह इतर योजनांची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याबाबत तपासणी केली जाणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी दोन महिन्यापूर्वी शिक्षकांसाठी ड्रेस कोडचा निर्णय घेतला होता मात्र त्याला काही शिक्षक संघटनांनी विरोध केल्यामुळे काही शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. मात्र नव्या वर्षांत या आदेशाचे पालन केले जावे यासाठी जिल्ह्य़ातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरील शाळांमध्ये तपासणी केली जाणार आहे. जे शिक्षक ड्रेस कोडप्रमाणे राहणार नाही त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाईचे संकेत अध्यक्षांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार असे तीन दिवस ड्रेसकोडमध्ये शाळेत जावे लागणार आहे. पुरुष शिक्षकांना पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट, तर शिक्षिकांना कथ्थ्या रंगाची साडी व पांढऱ्या रंगाचा काठ असा ड्रेसकोड आहे.
शिक्षकांना ड्रेसकोडबाबत काहीच अडचणी नाही मात्र शिक्षिकांना याबाबत अडचणी असल्यामुळे काही शिक्षक संघटनांनी ड्रेसकोडला विरोध केला. संध्या गोतमारे यांनी निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र त्या संदर्भात सक्ती न केल्याने शिक्षक द्विधा मनस्थितीत आहे. शिक्षण सभापती आणि अध्यक्ष यांनी शिक्षिकांना दोन महिन्यापूर्वी साडय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. संबंधित महिला बचतगटाकडून ड्रेसकोडचे देयक देत नसल्याची बाब पुढे आली होती.
दरम्यान, काळात अधिवेशनामुळे ड्रेसकोडची अंमलबजावणी थंडावली होती. नव्या वर्षांत ड्रेसकोडची प्रत्येक शाळेत अंमलबजावणी व्हावी यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले असून ते प्रत्येक शाळांना भेटी देणार असल्याचे गोतमारे यांनी सांगितले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग उत्तम प्रकारे होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे.  ग्रामीण भागात तंबाखू सेवनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले असताना तंबाखू मुक्ती अभियानाची अंमलबजावणी शाळांमध्ये केली जात आहे की याची तपासणी करण्यात येणार आहे. या शिवाय ग्रामपंचायतींना आकस्मिक भेटी देणार असून त्याठिकाणी ग्रामपंचायतची व त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेण्यात येईल.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, पर्यावरण संतुलित समुद्ध ग्राम योजनांची माहिती घेण्यात येईल.
या संदर्भात कुठलेही कर्तव्यात कसूर व कामचुकारपणा दिसून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे गोतमारे यांनी सांगितले.