विधानसभा निवडणुकीत ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेऊन भाजप आणि शिवसेनेतील अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. दक्षिण नागपूर मतदारसंघावर शिवसेनेने यापूर्वीच दावा केल्यामुळे ती जागा भाजपला मिळणे शक्य नसल्याने भाजपचे नेते आणि नगरसेवक छोटू भोयर शिवसेनेत, तर अचलपूरचे आमदार बच्चू कडू भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित होताच विविध राजकीय पक्षातील इच्छुक दावेदार उमेदवारी मिळविण्यासाठी कामाला लागले आहेत. दक्षिण नागपूर मतदारसंघ हा गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडे होता. त्यामुळे यावेळी तो राहावा, यासाठी शिवसेनेने सुरुवातीपासून या मतदारसंघावर दावा केला आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण नागपूरमध्ये मिळालेले मताधिक्य बघता भाजपला हा मतदारसंघ मिळावा, यासाठी दक्षिण नागपुरातील भाजपचे काही नेते प्रयत्नात असून त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीकडे तसे निवेदन दिले होते.
सेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे गेल्या पाच वर्षांत मतदारांशी जनसंपर्क ठेवून असून पक्षाकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचे नेते आणि नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त छोटू भोयर यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात मोर्चेबांधणी केली. मधल्या काळात राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रुडी नागपुरात आले असता ते छोटू भोयर यांच्या निवासस्थानी गेले होते. छोटू भोयर सध्या नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आहेत. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. भाजपला दक्षिण नागपूर मिळाला नाही, तर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडू घ्यायची, या उद्देशाने ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मनस्थितीत आहे. मुंबईत त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची चर्चा शहरात आहे.
दरम्यान, अचलपूरचे आमदार बच्चू कडू अपक्ष आमदार असून विविध विषयांवर आंदोलन करीत त्यांनी सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील अपंगांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी मुंबईत तत्कालिन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर रात्रभर आंदोलन केले. अचलपूरमधून तीन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले बच्चू कडू यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बच्चू कडू यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केवळ अफवा -छोटू भोयर
या संदर्भात छोटू भोयर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शिवसेनेत जाणार असल्याची जी काही चर्चा आहे ती केवळ अफवा असून त्यात काही तथ्य नाही. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे निवडणुकीत काम करणार आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात सध्या निर्णय घेतला नसला तरी १७ सप्टेंबपर्यंत वाट पहा, असे बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे म्हणाले, छोटू भोयर शिवसेनेत येणार, अशी कुठलीही चर्चा नसून केवळ अफवा आहे. दक्षिण नागपूर शिवसेनेकडे राहणार असून पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी निवडणूक लढेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chotu bhoyur and bacchu kadu erspectivaly entered in shivsena and bjp
First published on: 16-09-2014 at 07:38 IST