चर्नी रोड येथील पादचारी पुलाच्या बांधकामाचा मुहूर्त आणखी पुढे ढकलला गेला आहे. या पुलाचा तिसऱ्यांदा आराखडा तयार करण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांच्या कल्पनेप्रमाणे आराखडा दोनदा तयार करण्यात आला. मात्र हेरिटेज समितीने आता या आराखडय़ातही बदल करण्याच्या सूचना दिल्याने पुन्हा एकदा या पुलाचे काम पुढे ढकलले गेले आहे.
चर्नी रोड येथील सुखसागर हॉटेलजवळ  शहरातील सर्वात पहिला सरकता जिना लावलेला पादचारी पूल होता. या पुलाचे बांधकाम १९५३ मध्ये करण्यात आले होते व १९७० मध्ये त्याला सरकता जिना लावण्यात आला. मात्र समुद्राच्या जवळ असल्याने लोखंडाला गंज चढल्याने तसेच वाळू जाऊन यंत्र सतत नादुरुस्त होत असल्याने ८० च्या दशकात हा जिना बंद करण्यात आला. त्यानंतर काळानुरूप जिना मोडकळीस आल्याने १० ऑगस्ट २०१३ रोजी पालिकेनेच हा पूल पाडला. या जागी पुन्हा त्याच पद्धतीने पूल बांधण्यासाठी पालिकेचे अधिकारी तयार होते. मात्र तेव्हाचे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी रुंद, आधुनिक पुलाचा आराखडा करण्याच्या सूचना दिल्या. हा आराखडा तयार होईपर्यंत त्यांच्या जागी एसव्हीआर श्रीनिवास यांची वर्णी लागली होती. श्रीनिवास यांनी रुंद पुलाऐवजी जुन्या पुलाप्रमाणेच साध्या सरळ पुलाचा आराखडा तयार करण्यास सांगितले. आता हा आराखडा मुंबई वारसा जतन समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र समितीने तो नाकारला. आजूबाजूचा परिसर लक्षात घेता हा साधा पूल योग्य दिसणार नाही. आजूबाजूच्या वास्तूंशी मेळ खाणारा पूल तयार करावा, अशी सूचना समितीने दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा या पुलाचे डिझाइन करण्याची वेळ आली आहे.
या ठिकाणी पूर्वी असलेल्या पुलाप्रमाणेच हा आराखडा तयार केला होता. मात्र समितीला तो मान्य नसल्याने पुन्हा काम सुरू आहे. इथे आधुनिक पूल बांधण्याची सूचना त्यांच्याकडून आली आहे, असे पूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलाच्या आराखडय़ासाठी एकूण निधीच्या तीन टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. मात्र प्रशासनामध्ये एकवाक्यता नसल्याने तिसऱ्यांदा पुलाचा आराखडा तयार करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी नागरिकांचा पसा खर्च होणार आहे, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.