सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे उच्च व मध्यम उत्पन्न वर्गासाठी बांधण्यात येणाऱ्या एक हजार २४४ घरांची नोंदणी १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. जागतिक आर्थिक मंदी व वाढत्या महागाईनंतर या घरांना कसा प्रतिसाद मिळतो याकडे सिडको अधिकाऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी सिडकोने काढलेल्या घरांच्या सोडतीवर ग्राहकांच्या उडय़ा पडलेल्या आहेत.
सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे पारसिक डोंगराच्या पायथ्याशी व तळोजा कारागृहाच्या मागे एक हजार २४४ घरांचा गृहनिर्माण प्रकल्प मागील वर्षी हाती घेण्यात आला आहे. खासगी बिल्डरांच्या स्पर्धेत या संकुलात तरणतलावापासून ते सीसी टीव्हीपर्यंत सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च करून या संकुलाजवळ तीन नमुना घरे तयार करण्यात आलेली आहेत. उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी ४०२ घरे, तर मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी ८०२ घरे बांधण्यात आली आहेत. यात सर्व घटकांना आरक्षण देताना सिडको कर्मचारी, पत्रकार, सैनिक यांना विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे.  १ जानेवारी रोजी या घरांची जाहिरात काढण्यात आली होती. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी त्यासाठी सिडकोच्या दोन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. अध्यक्षाच्या आग्रहास्तव केवळ जाहिरात देऊन मोकळे झालेल्या या दोन अधिकाऱ्यांनी मागील आठवडय़ात या घरांची नोंदणी पुस्तिका छापण्यासाठी छापखान्यात पाठविली आहे. जाहिरातीत जाहीर केल्याप्रमाणे या घरांची नोंदणी गुरुवार, १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सिडकोच्या नवी मुंबईतील दोन व मुंबईतील एका कार्यालयात अर्ज मिळणार आहे. याशिवाय ठाणे जनता सहकारी बँकेच्या शाखामधून मिळणार आहेत. या घरांचे दर खासगी बिल्डरांच्या घरांएवढेच असल्याने ग्राहकांचा त्याला कमी प्रतिसाद मिळेल असा अंदाज रिएल इस्टेटमधील जाणकारांच्या वतीने व्यक्त केला जात आहे. पाच ते सहा हजार प्रति चौरस फूट असलेला हा दर या भागातील काही खासगी बिल्डरांनी ठेवला आहे. खासगी बिल्डरांची आर्थिक स्थिती सध्या बेताची झाल्याने त्यांना लवकर रक्कम भरण्याची हमी दिल्यास ते या दरात कमी करण्याची शक्यता आहे, पण सिडकोचे दर कमी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने ग्राहकांचा प्रतिसादाकडे सर्वाचे लक्ष आहे. विशेष म्हणजे हा दर सिडकोने कमी करावा यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केलेला नाही.