वैद्यकीय उद्देशासाठी सिडकोकडून मिळणारे भूखंड पदरात पाडून घेण्यासाठी सर्व नियम आणि अटींना प्रतिज्ञापत्राद्वारे संमती देणाऱ्या नवी मुंबईतील रुग्णालय संचालकांना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी गुरुवारी चांगलीच तंबी दिली. रुग्णालयातील एकूण खाटांपैकी प्रकल्पग्रस्त आणि गरीब गरजू रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांचा दैनंदिन अहवाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ आणि रुग्णालयाच्या वेबसाइटवर टाकण्याचे आदेश भाटिया यांनी दिले. या बैठकीला शहरातील जवळपास ११ बडय़ा रुग्णालयाचे प्रतिनिधी हजर होते.
नवी मुंबईतील सिडकोच्या १४ नोडमध्ये रुग्णालयासाठी राखीव भूखंड ठेवण्यात आले होते. काही शिक्षणसम्राटांच्या मागणीनुसार हे भूखंड त्यांना देण्यात आलेले आहेत. त्यात त्यांनी मेडिकल कॉलेज आणि त्यासाठी लागणारे रुग्णालय उभारले आहे. बाजारभावापेक्षा दहा ते पन्नास टक्के रकमेत हे भूखंड देण्यात आल्याने काही संस्थांनी प्रत्येक नोडमध्ये असे भूखंड घेतलेले आहेत. हे भूखंड घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना व गरीब गरजू रुग्णांना एकूण खाटांच्या दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्या वेळी या संस्थांनी या अटींना सहज मान्यता दिली पण त्यांनंतर ही सवलत देताना हात आखडता घेतला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी २६ कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांच्या सर्वागीण विकासाचा विचार करण्यात आला असून रुग्णालयात प्रकल्पग्रस्तांना सवलतीच्या दरात उपचारांचा अंतर्भाव आहे. त्यामुळे गुरुवारी भाटिया यांनी एमजीएमच्या चार, डी. वाय. पाटील यांच्या एक, वाशीतील पंजाब केसरी आणि कसेबकर हॉस्पिटल, कोपरखैरणे येथील लक्षद्वीप आणि माथाडी रुग्णालयांच्या संचालक, विश्वस्तांना बोलविले होते. सिडकोला लिहून दिलेल्या करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त व गरिबांना दहा टक्के राखीव खाटा व उपचारांची अंमलबजावणी करण्याचे भाटिया यांनी निदर्शनास आणून दिले. हा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व रुग्णालयांनी त्यांच्या राखीव खाटा या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ जाहीर कराव्यात तसेच वेबसाइटवर हे अपडेट टाकण्याच्या सूचना भाटिया यांनी केल्या. वाशी एमजीएममध्ये असा फलक आहे. या रुग्णालयांना दिलेले भूखंड हे पणन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्यांची पूर्ण यादी अद्याप आरोग्य विभागाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे नवी मुंबईतील छोटय़ा-मोठय़ा सर्व रुग्णालयांच्या संचालकांना अद्याप बोलविण्यात आलेले नाही पण सिडको आता एक नोटीस या सर्व रुग्णालयांना देऊन या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोने नवी मुंबई पालिकेलाही वाशी येथे सुमारे अडीच एकरांचा भूखंड मोफत रुग्णालयासाठी दिला आहे. या रुग्णालयातील अर्धा भाग पालिकेने प्रथम हिरानंदानीला आणि हिरानंदानीने फोर्टीजला दिला आहे. त्यामुळे सिडकोने पालिकेच्या अधिकाऱ्यांनादेखील या बैठकीला बोलविले होते. सिडकोबरोबर केलेल्या करारनाम्यातील अटींची पूर्तता पालिकेनेही करावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. पालिका आता फोर्टीजला ह्य़ा सूचना कळविणार आहे. गेली कित्येक वर्षे या अटींची फोर्टीज पूर्णपणे अंमलबजावणी करीत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.  

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco managing director order to released daily report of reserved bed for poor patients
First published on: 20-06-2014 at 01:55 IST