विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही सिडको संचालक मंडळाच्या संचालकपदाला चिकटून बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना हटविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संचालक मंडळ बरखास्तीचे हत्यार उपसावे लागणार आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोत अध्यक्ष किंवा संचालकपदावर वर्णी लागावी यासाठी भाजपमधील अनेक धुरिणांनी फिल्डिंग लावली आहे. राज्य सरकारमध्ये शिवसेनेबरोबर युती झाल्यास दोन संचालकपदे त्यांच्या वाटय़ाला येण्याची शक्यता आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल १६ ऑक्टोबर रोजी लागले. त्या दिवशी राज्यातील पक्षीय बलाबल स्पष्ट झाले. सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मागील एक महिन्यात झालेल्या या घडामोडीनंतर सिडको संचालक मंडळातील ११ संचालकांपैकी चार संचालक हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. इतर संचालक हे विविध महामंडळे व प्राधिकरणाचे सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून राष्ट्रवादीचे संचालक व सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, वसंत भोईर, काँग्रेसचे नामदेव भगत, आर. सी. घरत यांनी रााजिनामे देणे अभिप्रेत होते पण सत्तेसाठी आसुसलेल्या या संचालकांनी अद्याप राजिनामा दिलेला नाही. अध्यक्ष हिंदुराव तर चक्क सिडकोत येऊन भेटीगाठी व दरबार घेत आहेत. काँग्रेसच्या घरत यांना तर निवडणुकीअगोदर एक महिना हे संचालकपदाचे गाजर देण्यात आले होते. संचालकपदांना चिकटून बसलेल्या या संचालकांमुळे मुख्यमंत्री फडणवीस संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करणार आहेत. त्यानंतर शासन नामनिर्देशित चार संचालक मंडळावर नियुक्त केले जाणार असून सात प्राधिकरणाचे संचालक म्हणून येणारे अधिकारीदेखील बदलणार आहेत. त्यानंतर संचालक मंडळाच्या रीतसर बैठका होणार असून सध्या अधांतरी असलेल्या या संचालक मंडळामुळे बैठका होत नाहीत. त्यामुळे काही महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. १९ वर्षांपूर्वी राज्यात असलेल्या युती शासन काळात सिडकोचे अध्यक्षपद भाजपचे नारायण मराठे यांना देण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे शिवसेनेपेक्षा कमी आमदार निवडून आले होते. त्यामुळे लहान भावाला हे पद देण्यात आले होते. या वेळी शिवसेना-भाजप युती झाल्यास सत्तेत लहान भाऊ सेना असल्याने सिडको अध्यक्षपद शिवसेनेच्या वाटय़ाला येण्याची शक्यता आहे मात्र सिडकोत असलेल्या करोडो रुपयांच्या ठेवींवर डोळा असलेले भाजप राज्य सरकार हे महामंडळ आपल्या हातात ठेवण्याची शक्यता आहे.
सिडको संचालक मंडळाचे सुकाणू व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हेदेखील दिल्लीत जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यासाठी ज्या प्रकल्पासाठी त्यांना सिडकोत पाठविण्यात आले होते तो नवी मुंबई विमानतळ प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याकडे त्यांचा कल आहे. दिल्लीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onसिडकोCidco
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco navi mumbai board of directors going to dissolve
First published on: 20-11-2014 at 09:40 IST