अपघात होत नाही असा एकही दिवस जात नसल्याने उरण व जेएनपीटी परिसरातील अनेकांना अत्याधुनिक सुविधायुक्त हॉस्पिटलच्या अभावामुळे अपघातग्रस्ताला त्याचे प्राण गमवावे लागत आहेत. यासाठी उरणमध्ये सिडकोने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी नागरिकांनी केलेली होती. मात्र उरण सोडून इतर ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा सिडकोने केल्याने उरणमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुका हा राज्यातीलच नव्हे तर देशातील औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जात असून या परिसरात उभ्या राहणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत्या अपघातात वैद्यकीय सुविधांअभावी नाहक गमवावे लागणारे जीव, तसेच ओ.एन.जी.सी.,भारत पेट्रोलियम, आय.ओ.टी.एल आणि जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या अतिसंवेदनशिल ज्वलनशील पदार्थामुळे उरण ज्वालामुखीच्याच मुखावर असून तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेने सिडको आणि राज्य सरकारकडे केली आहे.
उरणच्या समुद्र किनारी ओ.एन.जी.सी.चा बॉम्बे हाय तेल विहिरीतील कच्च्या तेलाचे शुद्धिकरण करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पात गॅस, पेट्रोल, डिझेल आणि अतिज्वलनशील असा नाफ्ताही आणला जात असून त्याची साठवणूक या प्रकल्पात केली जाते. या अतिज्वलनशील नाफ्त्याला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच एका घटनेत दोन ग्रामस्थांना प्राणही गमवावे लागले आहेत. दुसरीकडे उरण तालुक्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.