राष्ट्रीय नागरी स्वच्छता धोरणांतर्गत महानगर पालिकेने ३३ प्रभागांचा शहर स्वच्छता आराखडा तयार केला असून या प्रभागातील विकास कामांकरिता निधी मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाला तो सादर करण्यात येणार आहे. या आराखडय़ात प्रभागातील स्वच्छतेसंबंधीच्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. कागदोपत्री हा आराखडा तयार झालेला असला तरी प्रत्यक्षात प्रभागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. या आराखडय़ाची कठोर अंमलबजावणी केल्यास शहरवासियांची अस्वच्छतेतून सुटका होणार आहे.
केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने राष्ट्रीय नागरी स्वच्छता धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता राज्य सरकारला प्रत्येक शहराचा स्वच्छता आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. हा आराखडा नियोजनबध्द पध्दतीने तयार करून राज्य व केंद्र शासनाकडे सादर करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला विकास कामांसाठी निधी उपलब्घ करून देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील पंधरा अ वर्ग शहरांचा शहर स्वच्छता आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महापालिकेच्या ३३ प्रभागातील ६६ नगरसेवकांच्या वॉर्डांचा शहर स्वच्छता आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात प्रभागाची भौगोलिक माहिती, प्रभागाचे क्षेत्रफळ, रस्त्यांची व गटारांची लांबी, बंदिस्त गटारांची एकूण लांबी, उघडी गटारे, वार्षिक पर्जन्यमान, प्रभागाची लोकसंख्या, वॉर्डातील घरांची संख्या, एकूण कुटूंब, एकूण मिळकती कुटूंबांची संख्या, निवासी व व्यापार इमारती, झोपडपट्टीत राहणाऱ्यांची एकूण संख्या, झोपडपट्टीतील कुटूंबांची संख्या, दारिद्रय़ रेषेखालील कुटूंबांची संख्या, घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, नळ संख्या, बगीचा, अग्निशमन व्यवस्था या सर्वाची नोंद या आराखडय़ात घेण्यात आलेली आहे.
प्रभागातील जलकुंभाची साठवण क्षमता, जलवितरण टाक्यांची संख्या, पूर्वापार विहिरींची संख्या, सार्वजनिक कुपनलिका, विहिरी, तलावांची संख्या याचीही माहिती या आराखडय़ात आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रभागात पालिकेने काय व्यवस्था केली आहे, याचीही माहिती आहे. यात घाणीचा निचरा कसा केला जातो, वैयक्तीक शौचालयांची संख्या, उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांची संख्या, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, विद्युत पुरवठा यासंबंधीचा सखोल आराखडा तयार केला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने काय व्यवस्था केली आहे, तसेच प्रभागात कचरा घंटागाडीव्दारे जमा केला जातो का, घंटागाडय़ांची संख्या, कचरापेटय़ांची संख्या, घनकचरा संकलन केंद्र आहे का, व्यावसायिक व औद्योगिक घनकचरा संकलनाची व्यवस्था याविषयीचीही माहिती घेण्यात आलेली आहे, तसेच प्रत्येक प्रभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, शहरातील इतर व्यवसायाची संख्या, जैविक कचरा नष्ट करण्याची पध्दत, प्रभागातील बाजार केंद्र, भाजी मंडई व खासगी, तसेच पालिकेच्या इमारतीमधून निर्माण होणाऱ्या दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण या माहितीची नोंद घेतली आहे. तसेच प्रभागात स्वच्छतेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याचीही सविस्तर माहिती घेण्यात आली आहे.
केवळ घनकचराच नाही, तर ई कचरा निघतो काय, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, ट्रक, हातगाडी, घंटागाडी यांची संख्या किती, प्रभागातील हाताने सफाई केल्या जाणाऱ्या रस्त्यांची लांबी, रस्ता सफाई करणारे कर्मचारी, पालिका कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, दैनंदिन सफाई होते का, हॅन्डग्लोज, गमबुट, मास्कचा वापर होतो का, जंतूनाशकांच्या फवारणीसाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे निर्देशही यात देण्यात आले आहेत हा आराखडा पूर्णपणे तयार झाला असून ३० डिसेंबर रोजी राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
चंद्रपूर महापालिकेचा शहर स्वच्छता आराखडा तयार
राष्ट्रीय नागरी स्वच्छता धोरणांतर्गत महानगर पालिकेने ३३ प्रभागांचा शहर स्वच्छता आराखडा तयार केला असून या प्रभागातील विकास कामांकरिता निधी मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाला तो सादर करण्यात येणार आहे.
First published on: 22-12-2012 at 01:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City cleanliness plan ready by chandrapur municipal corporation