डेंग्युची तीव्रता वाढत असताना आणि पालिका व आरोग्याची यंत्रणा त्यावर नियंत्रणात मिळवण्यासाठी धडपडत असताना कचरा हटविण्याच्या मुद्यावर नगरसेवक हद्दीचा वाद घालण्यात धन्यता मानत आहेत. पालिकेच्या कारभाराकडे बोट दाखवताना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन लोकप्रतिनिधींकडून होत आहे. चेतनानगर परिसरात डेंग्युमुळे रुग्ण दगावल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यंत्रणेच्या सोबतीने तत्परतेने तेथील कचरा उचलण्याचे कर्तव्य पार पाडले. मात्र उशीराने सुचलेल्या शहाणपणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

डेंग्युची वाढता ‘ताप’ पाहता आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, नागरिकांचे प्रबोधन, धूराळणी, फवारणी यासह विविध मार्गाचा अवलंब करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. महापालिकेनेही ‘ब्लॅक स्पॉट’ सांगा, छायाचित्र पाठवा, तक्रारीसाठी भ्रमणध्वनी सेवा सुरू केली आहे. याबाबत नागरिकांनी सजग राहून तक्रार करावी, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. मात्र पालिकेचा संबंधित विभाग याकडे केवळ सोपस्कार म्हणून पाहत असून स्वच्छतेच्या कामात उदासीन असल्याचे अधोरेखीत होते. चेतना नगर परिसरातील शीतल अपार्टमेंटमधील रहिवासी जितेंद्र कुलकर्णी यांचा डेंग्युने मृत्यू झाला. या परिसरातील कचरा आणि घाणीचे साम्राज्याबद्दल भ्रमणध्वनी सेवेद्वारे पालिकेच्या आरोग्य विभाग, नगरसेवकांना स्थानिकांनी कळविले होते. मात्र लघुसंदेश पाठवून ७२ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही कचरा उचलण्याच्या दृष्टीकोनातून काहीच हालचाल झाली नाही. या कालावधीत कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांचा संताप पाहता नगरसेवकांनी तेथील कचरा तत्परतेने उचलण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली. मात्र हे उशीराने सुचलेले शहाणपणावर नागरीकांनी रोष प्रगट केला आहे. या संदर्भात नगरसेविका अर्चना जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे पती संजय जाधव यांनी उपरोक्त प्रकाराबाबत माहिती दिली. परिसरातील कचऱ्याविषयी पालिकेच्या संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदने तसेच भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र परिस्थितीत फरक नाही. परिसरात अनेक मोकळे भूखंड आहेत. स्थानिक नागरीक मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकतात. यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या कॉलनीतील काही भाग शिवसेना नगरसेवकांच्या हद्दीत असल्याने कामात अडचणी येतात असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वच्छतेबाबत पुढाकार घेतल्याशिवाय परिस्थितीत बदल होणार नाही असेही ते म्हणाले. डेंग्युचे संकट जिवावर बेतत असताना नगरसेवकांनी केवळ आपल्या हद्दीपुरतेच पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला आहे. खरेतर या स्थितीत कचरा हटविण्याचे काम युध्दपातळीवर होण्याची गरज असताना नगरसेवक मात्र हद्दीच्या वादात गुरफटून पडल्याचे पहावयास मिळत आहे.