दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सहकारी बँकांनी दुष्काळग्रस्त भागात आपले योगदान देण्याची वेळ आली असून लासलगाव र्मचट बँकेच्या यशस्वी वाटचालीस तरुणाईने केलेले योग्य नियोजन जबाबदार आहे. त्यामुळेच आज बँकेची जिल्ह्यात चर्चा होत असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
लासलगाव बँकेच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक संचालक बाबुलाल ब्रम्हेचा हे होते. व्यासपीठावर आ. अनिल कदम, बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, भास्कर कोठावदे, किसनलाल बोरा, चांगदेवराव होळकर, अजयकुमार ब्रम्हेचा, बँकेचे अध्यक्ष किसन दराडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात काही बँकांची परिस्थिती बिकट आहे. ग्रामीण भागात असलेल्या लासलगाव र्मचट बँकेने गेल्या काही दिवसांत केलेली प्रगती व त्यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अजय ब्रम्हेचा यांनी आज बँक नफ्यात असून प्रगतीचा वेग पुढील पाच वर्षांत दोनशे टक्क्यांपेक्षा अधिक राहील असा आशावाद व्यक्त केला. जयदत्त होळकर, भास्करराव कोठावदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार जनसंपर्क संचालक ज्योती ताथेड यांनी मानले.