या जिल्ह्य़ातील वेकोलिच्या २८ खाणी गैरव्यवहाराचे मुख्य केंद्र बनल्या असून रात्रीच्या अंधारात कोळशाची खुलेआम तस्करी सुरू आहे. स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादानेच ही तस्करी सुरू असल्याने गॅंग ऑफ वासेपूरप्रमाणेच येथे तस्करीत सक्रीय असलेल्या गॅंग ऑफ चंद्रपूर सक्रीय आहेत.
‘दि ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून सर्वत्र प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात वेकोलिच्या २८ कोळसा खाणी आहेत. त्यापैकी ११ भूमिगत व १७ खुल्या पध्दतीच्या खाणी आहेत, तसेच यवतमाळ जिल्ह्य़ात एकूण ११ कोळसा खाणी असून त्यापैकी ८ खुली खाण असून उर्वरित तीन भूमिगत खाणी आहेत. या सर्व कोळसा खाणी आज गैरव्यवहाराचे मुख्य केंद्र बनल्या असून वेकोलि अधिकारी, पोलिस दल व स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने येथे खुलेआम तस्करी सुरू असते. चंद्रपूर शहरालगतच्या लालपेठ, पद्मापूर, दुर्गापूर ओपन कास्ट, महाकाली कॉलरी, तसेच नांदगाव या खाणींमधून दररोज कोटय़वधीच्या कोळशाचे उत्खनन होते. हा कोळसा दुर्गापूर महाऔष्णिक केंद्रासोबतच स्थानिक छोटे-मोठे उद्योग व व्यापाऱ्यांनाही विकला जातो, तर तस्करांच्या माध्यमातून कोटय़वधीच्या कोळशाची चोरी होते. शहरालगतच्या बाबूपेठ, भिवापूर व कॉलरी परिसरात गॅंग ऑफ वासेपूरच्या धर्तीवर येथे गंॅग ऑफ चंद्रपूर सक्रीय आहेत. या तस्करांमध्ये कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आहेत. वेकोलिच्या खाणीतून निघणारा कोळसा चोरी करायचा आणि तो ट्रकमध्ये भरून इतरत्र विक्री करायचा, तसेच या परिसरातून रेल्वेच्या व्ॉगन्समधून जाणाऱ्या कोळशाची सुध्दा अशाच प्रकारे तस्करी होते. रात्रीच्या अंधारात, तसेच पहाटेच्या अंधूक उजेडात ही तस्करी मोठय़ा प्रमाणात होते.
केवळ चंद्रपूरच नाही, तर बल्लारपूर शहरात सुध्दा राजकीय आशीर्वाद असलेल्या कोळसा तस्करांच्या टोळय़ा येथे सक्रीय आहेत. सास्ती कॉलरी, बल्लारपूर ओपर कास्ट, मुंगोली खाणीतून मोठय़ा प्रमाणात कोळशाची चोरी होते. घुग्घुस शहराच्या सभोवताल मोठय़ा प्रमाणात कोळसा खाणी आहेत. निलजई, घुग्घुस ओपन कास्ट व अन्य खाणी सुध्दा येथे आहेत. या शहराचे संपूर्ण अर्थकारणच कोळशाच्या तस्करीवर आहे. कोळसा तस्करीच्या येथे मोठय़ा मोठय़ा गंॅग सक्रीय आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तिरुपती पॉल याची हाजी सरवर या तस्कराने भररस्त्यात हत्या केली. या हत्याकांडानंतर सरवर अटकेत आहे. मात्र, या घटनेनंतर घुग्घुसमधील वातावरण दूषित झाले आहे. भद्रावती व वरोरा या दोन तालुक्यांसह माजरी येथे सुध्दा अशाच कोळसा तस्करांच्या गंॅग सक्रीय आहेत. यापूर्वी तस्करीच्या भांडणावरूनच मनसे नेते सूर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर माजरी येथे सुध्दा गॅंगवारसारखे वातावरण आहे. दोन ते तीन दिवसाआड माजरी येथे गॅंगवार होत असल्याचे चित्र बघायला मिळते. केवळ कोळसा तस्करीतील वर्चस्वाच्या लढाईसाठी या तस्करांमध्ये गॅंगवार होत असते. वेकोलिच्या मुंगोली खाणीत सुध्दा गॅंगवारचेच चित्र बघायला मिळते. या सर्व तस्करांना सर्वपक्षीय राजकीय आशीर्वाद आहे. यातूनच या सर्व गॅंग येथे सक्रीय आहेत. केवळ वेकोलिच्या कोळसा खाणीच नाही, तर भद्रावती येथील कर्नाटक एम्टा या खाणीवर वर्चस्व राहावे म्हणून विविध राजकीय पक्षांचे नेते सुध्दा आपसात भिडलेले आहेत. यातून काही दिवसापूर्वी येथे राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी समोरासमोर उभे ठाकले होते, परंतु आपसी समझोत्यानंतर प्रकरण निवळले, तर पोलिस अधिकाऱ्याने कामगार नेत्याला मारहाण केल्यामुळे देखील वातावरण दूषित झाले होते. पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर सध्या तरी एम्टा येथील वातावरण शांत आहे. एकूणच वेकोलिच्या बहुतांश खाणी या तस्करीचे मुख्य केंद्र बनल्या आहेत.
कोल डेपोही तस्करींचे केंद्र
चंद्रपूर-नागपूर मार्गावर पडोली, ताडाळी येथे कोळसा व्यापाऱ्यांचे कोल डेपो आहेत. या कोल डेपोंच्या माध्यमातून सुध्दा मोठय़ा प्रमाणात तस्करी होते. कोल डेपोच तस्करीचे केंद्र बनले आहेत. काल पोलिसांनी कोळसा गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या करीम अब्दुल शेख व मोहन व्यंकटरमण्णा रेड्डी या दोघांना अटक केली. वेकोलिच्या खाणीतून निघणारा चोरीचा कोळसा डेपोपर्यंत आणण्यात या दोघांचा हात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal smuggling in chandrapur
First published on: 18-04-2014 at 07:33 IST