देशभरातील कोळसा खाणीत काम करणारे कामगार तसेच यासंबंधी काम करणाऱ्या कंत्राटी कोळसा कामगारांना नवी वेतनश्रेणी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी २०१३ पासून ही नवी वेतनश्रेणी अंमलात येईल.
अकुशल कामगारांना मूळ वेतन ४६४ रुपये, समकुशल ४९४ रुपये, कुशल ५२४ रुपये व अतिकुशल कामगाराला ५५४ रुपये अशी ही नवी वेतनश्रेणी आहे. खाण कायदा १९५२नुसार वॉशरी, सीएचपी, रेल्वे सायडिंगमध्ये तसेच कोळसा वाहतुकीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनासुद्धा ही वेतनश्रेणी मिळणार आहे. कोल कंपनीच्या रुग्णालयात त्यांना बाह्य़रुग्ण व आंतररुग्ण सुविधा मिळतील. भूमिगत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दहा टक्के भूमिगत भत्ता मिळणार आहे. प्रत्येकवर्षी १ एप्रिल व १ ऑक्टोबरला ग्राहक निर्देशांकाप्रमाणे व्हीडी भत्ता मिळेल. १ जानेवारी २०१३ पासून ही नवी वेतनश्रेणी अंमलात येईल.
कोल इंडियाच्या कोलकाता मुख्यालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आर. मोहनदास, ए. चॅटर्जी हे कोल इंडियाचे संचालक, भारत कोल कोकिंग लिमिटेडचे अतिरिक्त प्रबंध संचालक टी.के. लहरी, महाव्यवस्थापक भगवान पांडेय तसेच इंटकचे अध्यक्ष राजेंद्रप्रसादसिंह, सरचिटणीस एस.क्यू. जमा, रमेंद्रकुमार आयटक, हिंद मजदूर सभेचे नाथुलाल पांडेय, भारतीय मजदूर संघाचे सुरेंद्रकुमार पांडेय, सिटूचे मिथिलेश कुमार सिंह हे कामगार नेते या बैठकीत सहभागी झाले होते.