तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका साथीदाराला शीतपेयातून विषारीद्रव्य पाजल्याची घटना गिट्टीखदान परिसरात घडली. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. सचिनकुमार उमाप्रसाद तिवारी (रा. बजरंग चौक, सुरेंद्रगड) हा विषबाधा झालेला विद्यार्थी मेयो रुग्णालयात उपचार घेत आहे. अकरावीत शिकत असलेला सचिन शनिवारी रात्री शिकवणीस जात होता. गिट्टीखदान परिसरातील के.टी. नगरमधून जात असताना त्याला त्याच्या शिकवणी वर्गातील तिघांनी थांबविले. ‘शिकवणी वर्गातील मुलीसोबत तू नेहमीच बोलतो, आमचेही बोलणे करून दे’ असा आग्रह धरला. सचिनने त्यास नकार दिला. त्यामुळे तिघांनीही त्याला जवळच्या एका दुकानात नेले. तेथे त्या तिघांनी त्याला शीतपेय जबरदस्तीने पाजले. ते प्यायल्यानंतर सचिनला उलटय़ा होऊ लागला. ते पाहून तिघेही साथीदार तेथून पळून गेले. उलटय़ा झाल्याने सचिन बेशुद्ध पडला. त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याला विषारीद्रव्यपाजण्यात आल्याचे निष्पन्न झाले. औषधोपचाराने शुद्धीवर आलेल्या सचिनची डॉक्टरांनी विचारपूस केली. त्याने घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. मेयो बूथवरून सूचना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादूरे यांच्यासह गिट्टीखदान पोलिसांनी मेयो रुग्णालयात जाऊन सचिनची जबानी नोंदविली. त्या व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गिट्टीखदान पोलिसांनी तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेत त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली.