सोमवारी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील विविध महाविद्यालयांनी ध्वजवंदनासोबतच विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे. यामध्ये स्वच्छता अभियानापासून ते जनगागृती अभियानापर्यंतचा समावेश असणार आहे.
राज्यातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यंदा ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यटनाचा विकास’ हा संदेश पसरविला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेसाठी राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जाणार आहे. या विद्यार्थ्यांचे सध्या विद्यापीठाच्या कालिना संकुलात प्रशिक्षण सुरू असून प्रशिक्षणास येताना सर्व विद्यार्थ्यांनी या संकल्पनेवर आधारित भित्तिचित्रे तयार करून आणली आहे, अशी माहिती राज्य एनएसएसचे प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी दिली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयापासून ते दादर रेल्वे स्थानकापर्यंत जागृती फेरी आयोजित करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी महाविद्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ही पुस्तिका विनामूल्य वाटली जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून दुपारी २ वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य जयमंगल धनराज यांनी दिली.
चर्चगेट येथील केसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सफाळेजवळील गावा महाविद्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण करणार आहेत. महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियानांतर्गत सफाळे येथील एका गावात स्वच्छतागृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ही स्वच्छतागृहे विद्यार्थ्यांनी स्वत: मेहनतीने उभी केली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व विद्यार्थी त्या गावात जाऊन उर्वरित काम पूर्ण करून स्वच्छतागृहे गावाला लोकार्पण करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कोलते यांनी स्पष्ट केले.
परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा प्रथमच शालेय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाविद्यालयाच्या स्वप्नपूर्ती या प्रकल्पांतर्गत शाळेत शिक्षण घेत असलेले २४ विद्यार्थी या वेळी आपली कला सादर करणार आहेत. महाविद्यालयातर्फे काळा चौकी, परळ, लालबाग, शिवडी या परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे काम ‘स्वप्नपूर्ती’ या प्रकल्पांतर्गत केले जाते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अविनाश कारंडे यांनी दिली. याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे अमली पदार्थविरोधातील जनजागृती अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. या अभियानांतर्गत विविध वस्ती, महाविद्यालयांसमोर जाऊन पथनाटय़ाद्वारे जागृती केली जाणार असल्याचेही डॉ. कारंडे यांनी स्पष्ट केले.