वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेचा नियमित प्रवास करणाऱ्यांना आता स्मार्ट कार्डमध्ये पैसे आहेत की नाही ही चिंता करावी लागणार नाही. ‘मुंबई मेट्रो वन’ने आता प्रवाशांसाठी ‘कॉम्बो कार्ड’ उपलब्ध केले असून स्मार्ट कार्डमधील रक्कम ५० रुपयांपेक्षा कमी झाली की आपोआप २०० रुपये त्यात जमा होतील. नंतर ती रक्कम बँक खात्यातून वळती होईल.
मेट्रो रेल्वेच्या नियमित प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ची सुविधा आहे. नंतर या कार्डमध्ये ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली. आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय या दोन बँकांच्या सहकार्याने ‘मुंबई मेट्रो वन’ने कॉम्बो कार्ड आणले आहेत. आतापर्यंत स्मार्ट कार्डमधील रक्कम तिकिटासाठी पुरेल याची काळजी घ्यावी लागायची. प्रवाशाने मेट्रोच्या तिकिटासाठी या कॉम्बो कार्डचा वापर करताच रक्कम ५० रुपये व त्यापेक्षा कमी असल्यास इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या माध्यमातून आपोआप २०० रुपये त्या कार्डवर जमा होतील. प्रवाशांना कोणत्याही कटकटीशिवाय सुलभपणे प्रवास करता येईल. नंतर ही रक्कम प्रवाशाच्या संबंधित बँक खात्यातून आपोआप वळती होईल. त्यामुळे कार्डमध्ये पैसे टाकण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही, रांगेत उभारावे लागणार नाही.