जमीन गेलेल्या लोकांनीच आंदोलन करावे, असे काही कुठे लिहिलेले नाही. माझ्यावर झालेली टीका आणि टीका करणाऱ्यांचा ढासळलेला समतोल म्हणजे विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव रद्द होण्याची सूचक शक्यता असल्याचे सांगताना,‘‘ मी केलेले काम उघड आणि स्पष्ट असल्याने माझ्यावर झालेले आरोप लोकांनीच खोटे ठरविले आहेत,’’ असे मत श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.  
कराड विमानतळ विस्तारवाढप्रश्नी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आरोपासंदर्भात  विचारले असता, डॉ. पाटणकर पत्रकारांशी बोलत होते. कार्यकर्त्यांच्या पैशावर नव्हे, तर घरचा पैसा खर्च करून काहीही अपेक्षा न ठेवता लोकांना न्याय मिळावा यासाठी ४० वष्रे मी सातत्याने चळवळ करत आहे. माझे हे काम अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हीच माझी ओळख आहे. स्वत:चे पैसे खर्च करून मी चळवळीत सहभागी होतो. ४० वर्षांपासून मी केलेल्या चळवळी सर्वज्ञात आहेत. त्या उघड आणि स्पष्ट आहेत. शासकीय अधिकारी, जनता, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार, खासदार या सगळय़ांना माझ्या कामाची पद्धत ज्ञात आहे. त्यामुळे मला स्वतंत्रपणे काही खुलासा करावा वाटत नाही. माझ्यावर आरोप करणारे लोक ज्या स्तराला गेले आहेत, त्या स्तरापर्यंत मला जाता येणार नाही किंवा मी जाणार नाही. मला त्याची गरजही वाटत नसल्याचे डॉ. पाटणकर म्हणाले.