भविष्याचा विचार करता केवळ जकातीच्या उत्पन्नावर अवलंबून राहता येणार नाही, पर्यायी स्रोत उपयोगात आणावे लागणार आहेत, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. जकातीशिवाय उत्पन्न मिळून देणाऱ्या करसंकलन, बांधकाम परवानगी, परवाना विभाग, पाणीपट्टी आदी विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट संकेत आयुक्तांनी यानिमित्ताने दिले आहेत.
अमेरिका दौऱ्यावरून परतलेल्या आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. या अभ्यास दौऱ्याविषयी त्यांनी अनौपचारिक माहिती दिली. दोन महिन्यांच्या या अभ्यासदौऱ्यात २१ जणांचा समावेश होता. त्यात भारत, पाकिस्तान व श्रीलंकेचे प्रत्येकी पाच तर बांगलादेशातील सहा सनदी अधिकाऱ्यांचा सहभाग होता. अमेरिकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को,
ओमाहा,  फिलाल्डेफिया आदी १० शहरांना भेटी दिल्या. तेथील प्रशासकीय कामकाजाचा अभ्यास केला. विशेषत: मूलभूत व्यवस्थापनावर आधारित कामाची माहिती घेतली. कचरा, सांडपाणी, वाहतूक, नगररचना, आपत्ती व्यवस्थापन
तसेच मोकळ्या जागांचे व्यवस्थापन समजून घेतले.
तेथे प्रभावीपणे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे गट यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेप्रमाणे समाजहितासाठी सामाजिक संस्था तसेच नागरिकांचे सहकार्य घेण्याचा विचार करू, शहरात प्रभावीपणे विकासकामे करण्यासाठी दौऱ्याचा उपयोग होईल, अशी टिपणी त्यांनी
केली.
अमेरिकेत थकबाकी नसते, त्याचा आदर्श घेत थकबाकीसंदर्भात आपणही उदासीन राहून चालणार नाही. विविध करांच्या माध्यमातून आपल्या कामांसाठी निधी उपलब्ध होतो, ही भावना जोपासणे गरजेचे आहे. नवे प्रकल्प पर्यावरण पूरक असावे, असे सांगत अमेरिकेत लोकप्रतिनिधींचा चुकीच्या पध्दतीने प्रशासकीय कामांमध्ये हस्तक्षेप होत नाही, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.