पथनाटय़ असो की, अन्य नाटक किंवा चित्रपट त्यात अभिनयाचा कास लागतो. अभिनय कला विकसित करण्यासाठी समाजात वावरताना आपली निरीक्षण शक्ती वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चित्रपट व नाटय़कलावंत डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
 सांस्कृतिक कार्य संचालनालय व शील नाटय़-पथनाटय़ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरदार पटेल महाविद्यालयात पथनाटय़ प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हरीश सहारे, शिबीर संयोजक नाटय़कलावंत प्रा. जयश्री कापसे-गावंडे, सुशील सहारे, नागेश दाचेवार, मिलिंद उमरे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सोनवणे म्हणाले, ओमपुरी, नसिरुद्दीन शहा किंवा अनेक दिग्गज कलाकारांनी विशिष्ट व्यक्ती रेखा साकारण्यासाठी त्या प्रकारच्या व्यक्तींच्या परिसरात मुक्काम ठोकला. तुम्हाला जर लष्करातील अधिकाऱ्यांची भूमिका करायची असेल तर ते कसे बोलतात, कसे चालतात हे बारकाईने टिपावे लागेल. अभिनयाच्या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर निरीक्षण शक्तीचा उपयोग करावा लागतो. जिद्द, चिकाटी, सातत्य व परिश्रम याशिवाय यश मिळत नाही. अभिनय क्षेत्रातही हाच नियम लागू होतो.
दोन दिवसाच्या या शिबिरादरम्यान डॉ. सोनवणे यांनी शिबिराच्या पथनाटय़ाचा इतिहास, सामाजिक व कलाविषयक महत्त्व सांगत प्रात्यक्षिकही सादर केले. या शिबिरादरम्यान शिबिरार्थीना अभिनय शिकवतानाच विविध पथनाटय़ांचीही निर्मिती करण्यात आली. याशिवाय, संवादफेक, मुद्राभिनय, अभिनयातील देहबोली, विनोदी भूमिकेतील टायमिंगचे महत्त्व, आवाजातील वैविध्य, भूमिकेत शिरण्याचे व त्यातून बाहेर पडण्याचे तंत्र, अशा अनेक बाबींवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सहय़ाद्री वाहिनीने खास पथनाटय़ावर घेतलेली प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांच्या मुलाखतीची चित्रफितही दाखविण्यात आली. त्यातून शिबिराथ्र्यीना काही बारीक सारीक गोष्टींची शिबिराच्या सुरुवातीलाच माहिती प्राप्त झाली. प्रास्ताविक सुशील सहारे यांनी केले. संचालन श्रीनिवास मुळावार यांनी, तर आभार अनिल वाकडे यांनी मानले. या शिबिरात शंभरहून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते.