मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील शंकरपटाला परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती ए.पी. लवांदे आणि न्यायमूर्ती ए.बी. चौधरी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली तेव्हा सावरगावात होणाऱ्या शंकरपटाला परवानगी दिली आहे.नागपूर खंडपीठात शंकरपट समिती व माजी आमदार सुनील शिंदे यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवरून जिल्हाधिकारी, तहसीलदारांना यापूर्वी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने नोटीस बजावली होती.
गेल्या ६० वर्षांपासून नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे बैलगाडी शर्यत अर्थात शंकरपट आयोजित केले जात असून येत्या ३ आणि ४ मार्च ला बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. बैलांच्या शर्यतीसाठी करण्यात आलेला अर्ज १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला आणि परवानगी नाकारली होती. नागपूर खंडपीठात या निर्णयाविरोधात माजी आमदार सुनील शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
सावरगाव येथे ३ व ४ मार्च ला होणाऱ्या शंकरपटाला नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती लवांदे आणि न्यायमूर्ती चौधरी यांनी शर्ती व अटींवर परवानगी दिली आहे. शंकरपटात काठीचा वापर केला जाणार नाही, पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि शर्यतीपूर्वी बैलांची शारीरिक तपासणी करावी अशा अटी व शर्ती ठेवल्या आहेत. नागपूर खंडपीठाने याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या धर्तीवर परवानगी दिली. अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. ऋषिकेश मराठे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला तर मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. नितीन सांबरे यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले.