येथील शेठ ना. बं. वाचनालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे ‘लग्ना तुझा रंग कसा ?’ या विषयावर प्रसिद्ध समुपदेशक पुण्याच्या वंदना कुलकर्णी यांनी विवाहोत्सुक युवावर्ग व पालकांना मार्गदर्शन केले.
वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पाठक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. मधुलिका महाजन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुलाखतपर झालेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांच्या मनातील प्रश्न डॉ. मुकुंद करंबळेकर यांनी वंदना कुलकर्णी यांना विचारले. यात जोडीदाराची निवड कशी करावी ? सहजीवनातील सुख दु:ख, समायोजन, समस्या या सर्व बाबतीतले सविस्तर विवेचन कुलकर्णी यांनी केले. लग्न ठरविताना पत्रिका वगैरेचे अवडंबर न करता एकमेकांची मते समजून घेणे महत्वाचे असते. लग्नातला आनंद व लग्न सतेज ठेवण्यासाठी या गोष्टीची जास्त आवश्यकता असते. कार्यक्रमात श्रोत्यांनीही शंका विचारल्या. आभार वाचनालयाचे कार्यवाह प्रकाश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक वसंत चंद्रात्रे, राजेंद्र चिमणपुरे, प्रा. दीपक शुक्ल आदी उपस्थित होते.
दरम्यान वाचनालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे  आयोजित दुसऱ्या कार्यक्रमात ‘संपादक तुमच्या भेटीला’ अंतर्गत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्त्री पुरूष समानता पुरूषांची डोकेदुखी.? विषयावर वाचकांशी संवाद साधण्यात आला.  वि. म. गिताली, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पाठक, उपाध्यक्ष डॉ. हेमांगी पूर्णपात्रे व सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. मुकुंद करंबळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गिताली , मानसी घाणेकर, उत्लप बाबुराव यांचे वाचनालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रास्तविक डॉ. मुकुंद करंबळेकर यांनी केले. वाचनालयात यावेळी ‘पुरूष उवाच’ वार्षिकाचे प्रकाशन गेल्या महिन्यात वाचनालयातील जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा बहुमान मिळणारे डॉ. बी. जे. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्त्री-पुरूष समानता पुरूषांची डोकेदुखी ? या विषयावर डॉ. करंबळेकर यांनी गिताली यांची प्रकट मुलाखत घेतली. स्त्री-पुरूष समानता म्हणजे स्त्रियांनी पुरूषांसारखे न वागता माणूस म्हणून एकमेकांचा मान, आदर, निर्णय स्वातंत्र्य मानले पाहिजे.
स्त्री विषयक कायद्याचा दुरूपयोग क्वचित होत असेल, परंतु समाजात मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसा थाबविण्यासाठी हे कायदे आवश्यक आहेत. राज्य घटनेत स्त्री पुरूष समानता हे मूल्य म्हणून अंतर्गत असलं तरी प्रत्यक्षात या समानतेच्या बाबतीत सामाजिक परिवर्तन होण्यासाठी फार मोठी वाटचाल बाकी आहे, असे त्या म्हणाल्या. आभार वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पाठक यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण गंगापूरकर यांनी केले. कार्यक्रमास वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक वसंत चंद्रात्रे, डॉ. सुनील घाटे, राजेंद्र चिमणपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.