आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना असलेल्या मार्च अखेरीस २७ मार्चपासून पाच दिवस सलग सुटय़ा घेण्याची संधी चालून आल्याने चाकरमान्यांचे चांगले  फावले असून अनेकांनी सलग सुटय़ांचा फायदा घेत शहराच्या बाहेर जाण्याचा बेत आखला आहे. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी २८ मार्चला एक दिवस सुटी घेतली तर त्यांना सलग पाच दिवस सुटय़ाचा आनंद उपभोगता येणार आहे.
पुढील आठवडय़ात मंगळवारी, २६ मार्चला होळी असून दुसऱ्या दिवशी २७ मार्च धूळवडीची सुटी आहे. साधारणत: होळीच्या दिवशी धुलिवंदनाचा माहोल असल्यामुळे त्यादिवशी जवळपास बहुतेक शासकीय आणि निमशासकीय अर्धा दिवसांचेच कामकाज होणार आहे. गुरुवारी एक दिवसाची सुटी टाकल्यास शुक्रवारी २९ मार्चला गुडफ्रायडे आणि ३० मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि चवथा शनिवार असल्याने सुटी आली आहे तर ३१ मार्चला रविवार आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सुटी घेतल्यास त्यांना सलग पाच दिवस सुटय़ा मिळणार आहेत.
सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस असून बारावीची परीक्षा २६ मार्चला संपणार आहे. आर्थिक वर्षांचा शेवट असल्याने बँका महिन्याच्या अखेरीस बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस बंद राहणार आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने अनेक चाकरमानी शहराच्या बाहेर जात असतात त्यामुळे या सलग सुटय़ाचा फायदा होणार आहे. नागपूर जिल्ह्य़ात आणि नागपूरपासून २००-३०० किलोमीटर परिसरात पर्यटनाची अनेक स्थळे
आहेत.
निसर्ग पर्यटनाच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत. एक दिवसात जाऊन परत येण्याची सोय काही पर्यटन कंपन्यांनी केली आहे. काही कंपन्यांनी पॅकेज टूर्सही ऑफर केले आहेत. अलीकडच्या काळात बाराही महिने पर्यटन कंपन्यांच्या व्यवसायात तेजी दिसून येते. त्यातच सलग सुटय़ा आल्या की कंपन्यांसाठी तो बोनस ठरतो, सध्या उन्हाळ्यासाठी बुकिंग सुरू आहे,पण त्या आधीही पर्यटक मोठय़ा प्रमाणात दोन किंवा तीन दिवसांच्या टुर्ससाठी चौकशी करीत असल्याचे कॉटेन मार्केट चौकातील महालक्ष्मी ट्रॅव्हलचे सारंग खांडेकर यांनी सांगितले.