प्रत्येक तालुक्यात महिलांचे मेळावे घेतले जातील. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आमचा पक्ष पोहोचेल व त्यात काँग्रेसने गोरगरिबांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती देऊ. राष्ट्रवादीने निवडणुकांची पूर्वतयारी केलेली पाहून काँग्रेसही मैदानात उतरली आहे, असे प्रतिपादन महिला काँग्रेस समितीच्या ग्रामीणच्या अध्यक्षा रूपाली ठेरे यांनी केले.
अकोला जिल्हा महिला काँग्रेस समितीची कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या, शासकीय योजनांची माहिती देण्याची कार्यशाळा आमचा पक्ष घेणार आहे. मंडळ व तालुकाध्यक्षांना त्यासंबंधीच्या पुस्तिका देण्यात येतील, असे सांगून रूपाली ठेरे म्हणाल्या की, गोरगरिबांना योजनांचा लाभ काँग्रेसच देऊ शकेल. महिलांच्या बुथ समित्या या कामासाठी स्थापन करण्यात येणार आहेत. त्यावर ३ ते ५ महिला सदस्य राहतील. गावातील प्रत्येक ठिकाणी पोहोचणे व तेथे योजनांची माहिती देणे हे कार्य महिला काँग्रेसच्या महिला करतील. काँग्रेसच्या जास्तीत जास्त समित्यांवर महिलांची नियुक्ती केली जाईल.
काँग्रेसचे हे निवडणुकीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे काय, असे विचारले असता त्यास त्यांनी होकार दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या युती संदर्भात प्रश्न केला असता त्यांनी यावर आपणास काहीच भाष्य करायचे नाही, असे सांगितले. काँग्रेस हा एक बळकट पक्ष आहे व तो लोकांपर्यंत पोहोचतो, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस सरकारच्या राजवटीत महागाई खूपच वाढली तेव्हा तुम्ही लोकांना काय सांगाल व काय कराल, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, महागाई संदर्भात महिला कांँग्रेस आंदोलने करील, तसेच निवेदनेही देऊ. विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची पूर्ण शक्यता असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, सशापुढे कासवच जाईल. आमचे कार्यकर्ते सध्या छुपे असून ते योग्य वेळी काम करतात. राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला मारतांना त्या म्हणाल्या की, आमच्या पक्षात दर्जेदार कार्यकर्ते आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन केले जाईल. शासकीय कार्यालयात योजनांची माहिती कार्यालयातून लोकांना दिली जात नाही, यावर आपला पक्ष काय करेल, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, पक्ष पातळीवर त्याची दखल घेतली जाईल. समस्या मार्गी लागेपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. पिण्याच्या पाण्याचीही मोठी  समस्या आहे. ती सोडविण्यासाठी काम केले जाईल. मूर्तिजापूर मतदार संघातून आपली उमेदवारीची शक्यता आहे काय, असे विचारल्यावर त्या त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. नव्या कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, १महासचिव, ७ सचिव, १७ सदस्य आहेत, तसेच प्रसिद्धी प्रमुख व कोषाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाराव विखे, हेमंत देशमुख, दांदळे,ज्ञानेश्वर ठेरे, व सलुजा आदी उपस्थित होते.