लॉर्ड बुद्धा टीव्ही वाहिनीचा वर्धापन दिन आणि संविधान दिनानिमित्त २५ व २६ नोव्हेंबरला दीक्षाभूमीवर संविधान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भैय्याजी खैरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संविधान दिनाचे औचित्य साधून नागपुरातील काही आंबेडकर वादी कार्यकर्त्यांनी एकत्र २६ नोव्हेबर २०१० ला पहिले बुद्धीस्ट वाहिनी लॉर्ड बुद्धा सुरू केली. गेल्या दोन वर्षांत विविध केबल चॅनलच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील विविध भागात लॉर्ड बुद्ध वाहिनी घरोघरी पोहचले आहे. संविधान दिनानिमित्त २५ नोव्हेंबरला ‘संविधान काव्यधारा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी ‘संविधान जागर काव्यधारा’ कार्यक्रम होणार असून यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दिल्लीमधील मान्यवर कवींना निमंत्रित करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबरला सकाळी ६ ते ८ संविधान जागर कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर भारतीय संविधान व वर्तमान राजनिती या विषयावर वंदना संघाच्या वतीन परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात पश्चिम बंगालचे मंत्री यु.एन. विश्वास, माजी खासदार रामविलास पासवान उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
या शिवाय काही स्थानिक विचारवंत या कार्यक्रमात सहभागी होतील. सायंकाळी आंबेडकरी प्रबोधनकार राहुल अनविकर यांचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.