पिण्याच्या पाण्यासाठी खासगी व शासकीय बांधकामांना स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे गवंडी, खोदकाम करणारे, सेंट्रिंग करणारे व सर्व प्रकारची कामे करणारे मजूर बेरोजगार झाले आहेत.
पाण्याची टंचाई अतिशय भीषण आहे. त्यामुळे जमिनीतील आहे ते पाणी सांभाळण्यास पर्याय नाही. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामास स्थगिती दिली आहे. झपाटय़ाने वाढणाऱ्या या शहरात परिसरातील सुमारे १५ हजार लोक रोजीरोटीसाठी वास्तव्य करून आहेत. गवंडी, प्लंबर, सेंट्रिंग काम करणारे, कुशल कामगार सुमारे ५ हजार आहेत. रोज हाताला काम मिळाले तर हजारभर रुपये दिवसभरात ही मंडळी कमावतात व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या बिगारी मजुरांना किमान ३०० रुपये मिळतात.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेशामुळे या मंडळींची रोजीरोटी बंद झाली आहे. कामाच्या शोधात जिल्हय़ातील औसा, निलंगा, चाकूर, अहमदपूर, उदगीर, रेणापूर आदी ठिकाणी ही मंडळी चकरा मारत आहेत. शहरात सुमारे १ हजार फ्लॅटचे बांधकाम सुरू होते. सळई, सिमेंट, वाळू, खडी, वीट आदींचा व्यवसाय करणाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली आहे. आगामी सहा महिने पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत व जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत बांधकामाची स्थगिती उठवण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
आदित्य डेव्हलपर्सचे जगदीश धूत यांनी कारखान्यात जसे स्लो डाऊन असते, त्यानुसार पूर्णपणे काम बंद करण्याऐवजी किमान निम्मा वेळ काम करण्याची परवानगी दिली तर सगळय़ांच्याच हाताला काम मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणी बिल्डर असोसिएशन एकत्रित आपली भूमिका मांडणार आहे. दुष्काळामुळे रोज नवनव्या समस्या समोर उभ्या राहात असून त्याचे चांगलेच चटके बसत आहेत.