विवाहितेचा छळ करून तिचा खून करणाऱ्या तीन आरोपींना उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवले. अप्पासाहेब कृष्णा नुल्ले, इंदूबाई अप्पासाहेब नुल्ले (दोघे रा. हुपरी), गीता काकासाहेब पाटील (रा.जनवाड, चिकोडी) अशी आरोपींची नावे आहेत.    
लक्ष्मी अनिल नुल्ले या विवाहितेस तिचा नवरा अनिल अप्पासाहेब नुल्ले, सासरा अप्पासाहेब, सासू इंदूबाई व नणंद गीता पाटील हे माहेरहून २५ हजार रुपये आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते. १४ ऑक्टोबर २००६ रोजी लक्ष्मी नुल्ले हिचा पती व कुटुंबातील लोकांनी खून केला. तिचे प्रेत शेजारच्या विहिरीत टाकून तिने आत्महत्या केल्याचा बहाणा केला होता. याबाबत महादेवी अण्णासाहेब भोसले यांनी हुपरी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली होती.     
हा खटला इचलकरंजी येथील अतिरिक्त सत्र न्या. पी. डी. संकपाळ यांच्यासमोर चालला. त्यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध सासू, सासरा व नणंद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी न्या. व्ही. के. कादिलरामानी व पी. डी. कोदे यांच्यासमोर झाली. त्यांनी तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्हय़ाचा तपास हुपरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक व सध्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सयाजी गवारे यांनी केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने एम. एम. देशमुख यांनी उच्च न्यायालयामध्ये काम पाहिले.