महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, महाबळेश्वर येथे आज २५२.०३ मि.मी. तर लामज येथे ३१० मि.मी. उच्चांकी पावसाची नोंद झाली. धोम धरणातून ८७०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
धोम धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटांनी उचलण्यात आले असून, त्यातून ८७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीत सुरू आहे. त्यामुळे वाईला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदी पात्रातील गणपती मंदिरात पाणी शिरले. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. महागणपती पूल पाण्याखाली गेल्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक सुरू राहिली. वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर सायंकाळी शहरातील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी शाळा व कार्यालये सुटण्यापूर्वी धरणातून १२०० क्युसेक पाणी कमी करण्यात आले. नदीतील पाणी कमी झाल्याने महागणपती पुलावरून वाहतूक सुरू झाली व किसन वीर चौक मुख्य पोस्ट कार्यालयाकडील वाहतुकीचा ताण कमी झाला.
महाबळेश्वर पाचगणी व वाईच्या पश्चिम भागात धोम व बलकवडी धरणाच्या पर्जन्य क्षेत्रात पाऊस सुरूच राहिला. बलकवडी धरण ८७ टक्के भरले असून, धरणातून तीन हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीतून धोम धरणात सोडण्यात येत आहे, तर धोम धरणातून ८७०० क्युसेक पाणी नदीपात्रा सोडण्यात येत आहे. धोम धरणात ११.४७ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. या मोसमातील २५२ मि.मी. (४९११.२०) एवढा पाऊस महाबळेश्वर येथे झाला. पाचगणी ५७.०२ मि.मी. (११०१), लामज ३१० मि.मी. (१८४७.९०), तापोळा ८४.४८ मि.मी. (६३२)  पाऊस, भुईंज खंडाळा भागात पावसाने आज मोठी उघडीप घेतली. महाबळेश्वर तहसील कार्यालयाने पडझडीचे आज पंचनामे केले. धोम धरणाच्या नव्या कालव्यातून २०० क्युसेक पाणी कोरेगाव खटावसाठी सोडले आहे. ते आज एकंबे रहिमतपूपर्यंत पोहोचले असून, त्या त्या भागातून ओढे नाल्यातून ते सोडून देण्यात आले आहे, तर बलकवडीच्या कालव्याचे पाणी वाढवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onवाईWai
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuous rainfall in wai mahabaleshwar
First published on: 02-08-2013 at 01:48 IST