सिंहस्थाची कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणांची सध्या लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे कुंभमेळ्याशी संबंधित इतर आनुषंगिक कामांत मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी राज्यातील इतर महापालिका आणि कंत्राटी कामगार हे दोन पर्याय धुंडाळण्यात आले आहेत. ऐन पावसाळ्यात होणाऱ्या सिंहस्थात रोगराईला निमंत्रण मिळू नये याकरिता सार्वजनिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. या कामात अतिरिक्त मनुष्यबळासाठी इतर महापालिका आणि कंत्राटी स्वरूपात थोडे थोडके नव्हे तर, ४१००हून अधिक कर्मचारी उपलब्ध केले जाणार आहेत. कागदोपत्री असणारे हे नियोजन प्रत्यक्षात आणण्याची तयारी सुरू आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ शासकीय विभागांमार्फत कामे वेगात सुरू असली तरी काही कामे अद्याप रडतखडत चालल्याचे लक्षात येते. वास्तविक सिंहस्थाची सर्व कामे मार्च अखेपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन होते. शासनाने आपली तिजोरी खुली केल्यानंतरही विविध अडथळ्यांचा सामना करावा लागल्याने काही कामांची मुदत मे अखेपर्यंत विस्तारली गेली आहे. या मुद्दय़ावरून विभागीय आयुक्तांनी अलीकडेच काही विभागांना कानपिचक्या दिल्या. कारवाईची तंबी दिली. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, चाललेल्या कामांचा आढावा घेतल्यास सार्वजनिक स्वच्छता हा कळीचा मुद्दा आहे. यंदाच्या सिंहस्थात पर्वणीच्या दिवशी ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. सुमारे २८० एकर क्षेत्रावर आकारास येत असलेले साधुग्राम हे लाखो साधूंच्या वर्षभर वास्तव्याचे ठिकाण राहणार आहे. पर्वणीच्या दिवशी जवळपास ३० लाख भाविक शहरात वास्तव्य करतील असा अंदाज आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहराच्या हद्दीलगत वाहनतळ उभारले जाणार आहेत. या ठिकाणांपासून ते शहर परिसरातील रस्ते, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शाही स्नान केले जाते, तो गोदाकाठावरील व सभोवतालचा परिसर, तपोवनातील साधुग्राम, शाही मिरवणूक मार्ग आदी ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी पालिकेला युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.
सार्वजनिक स्वच्छतेचे नियोजन करताना साधुग्राम, गोदावरी नदीलगतचे घाट, शहरातील बाह्य व अंतर्गत वाहनतळ, शाही मार्ग, सर्व भाविक मार्ग, प्रशासकीय व महत्त्वाचे रस्ते आदी डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले आहे. उपरोक्त ठिकाणी मनुष्यबळाचे नियोजनाचा कालावधी वेगवेगळा आहे. साधुग्राम येथे सेक्टरनिहाय साफसफाई व स्वच्छतेची कामे केली जातील. १ ऑगस्ट २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ या ६१ दिवसांच्या कालावधीसाठी केरकचरा संकलन व वाहतूक करण्याचे काम केले जाईल. गोदावरी नदीलगतचे सर्व घाटांच्या स्वच्छता कामासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर असे ९२ दिवस तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरातील बाह्य व अंतर्गत वाहनतळ, शाही मार्ग, भाविक मार्ग, प्रशासकीय मार्ग या ठिकाणी पर्वणीच्या कालावधीत प्रत्येकी तीन दिवस म्हणजे एकूण नऊ दिवस साफसफाई करण्यात येणार आहे. साधुग्राममधील स्वच्छतेसाठी २०० मीटरकरिता एक सफाई कामगार, दहा सफाई कामगारांसाठी एक स्वच्छता मुकादम आणि पाच स्वच्छता मुकादमसाठी एक स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल.
या कामांसाठी महापालिकेला ४१७३ अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ कंत्राटी तत्त्वावर घेतले जाणार आहे. तसेच इतर महापालिकांकडून त्या त्या ठिकाणचे सफाई कामगार उपलब्ध व्हावेत, असा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यात कुंभमेळा होणार असल्याचे साफसफाईच्या कामांवर विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यात काही उणीव राहिल्यास शहरात आरोग्याचे प्रश्न भेडसावू शकतात. नियोजनानुसार उपरोक्त कार्यवाही प्रगतिपथावर असून सिंहस्थाला सुरुवात होण्याआधी मनुष्यबळाची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.