वर्षांच्या शेवटी होणाऱ्या लेखी परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी कोणत्याही पूर्वअभ्यास वा पूर्वतयारीशिवाय लागू केलेल्या श्रेयांक-श्रेणी पद्धतीमुळे (क्रेडिट ग्रेडिंग) विद्यार्थ्यांचा अध्यापनाचा तर प्राध्यापकांचा अध्ययनाचा वेळ कमी झाल्याचा निष्कर्ष एका पाहणीच्या निमित्ताने पुढे आला आहे. इतकेच नव्हे तर नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉपीची सवय बळावते आहे, असा धक्कादायक अनुभव शिक्षकांनी नोंदविला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्याच संख्याशास्त्र विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने विविध पदवी महाविद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नावलीच्या आधारे केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष नोंदवून घरचा अहेर दिला आहे.
पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये श्रेयांक-श्रेणी पद्धतीच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. विषय निवडीतील लवचिकता व एकाच लेखी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विषयज्ञान तपासण्याच्या पद्धतीला मिळणारा फाटा हे या पद्धतीचे प्रमुख वैशिष्टय़. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लवचिक आणि आदर्श असल्याने ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’नेही ही पद्धती अवलंबण्याबाबत विद्यापीठांना निर्देश दिले होते. पण, भरमसाठ विद्यार्थी आणि तुलनेत कमी शिक्षक यामुळे ही व्यवस्था सध्याच्या परिस्थितीत तरी अवलंबणे शक्य नसल्याने भारतातील फारच थोडय़ा विद्यापीठांनी याला प्रतिसाद दिला आहे. अपवाद मुंबई विद्यापीठाचा. पण, क्रेडिट पद्धतीची व्यवहार्यता न तपासता लागू केल्याने दोन वर्षांतच त्याचे दुष्पपरिणाम महाविद्यालयांमध्ये दिसू लागले आहेत. आतापर्यंत केवळ ‘बुक्टू’ ही शिक्षक संघटनाच या विरोधात विद्यापीठाशी भांडत आली आहे. पण, संख्याशास्त्र विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटींवर बोट ठेवल्याने श्रेयांक-श्रेणी पद्धतीत सुधारणा करण्याच्या अन्यथा पूर्णपणे रद्दबातल करण्याच्या शिक्षकांच्या मागणीला जोर येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयांतील ३२९ शिक्षक व पहिल्या वर्षांच्या १,२६२ आणि तृतीय वर्षांच्या ८७९ विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली भरून घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
विद्यापीठाची पद्धत बनावट
विषयांच्या निवडीबाबत लवचिकता या व्यवस्थेचा मूळ गाभा आहे. पण, विद्यापीठाने नेमकी हीच सोय उपलब्ध करून दिलेली नाही, याकडे शिक्षक लक्ष वेधतात. या पद्धतीत लहानमोठय़ा असाईनमेंट, चाचणी परीक्षा, वर्गातील हजेरी, इतर शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रमांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे असते. पण, विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाचे अहवाल ठेवण्याचे काम खूप वाढल्याने अध्यापनाचा वेळ कमालीचा कमी झाल्याची तक्रार बहुतांश शिक्षकांनी केल्याचे विभागाचे प्रमुख उल्हास दीक्षित यांनी सांगितले. पाश्चात्य देशांत अवलंबल्या जाणाऱ्या क्रेडिट पद्धतीची तोडमोड करून आपल्याकडे राबविण्यात येत आहे. त्यामुळे, त्याचे मूळ उद्दिष्टच साध्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बनावट पद्धतीमुळे ६४ टक्के शिक्षकांनी जुनीच पद्धत लागू करावी तर ८६ टक्के शिक्षकांनी ही पद्धत बंद करा किंवा त्यात बदल करा अशी मागणी केली आहे. ६४ टक्के विद्यार्थ्यांनीही शिक्षकांप्रमाणेच मत व्यक्त करीत ही पद्धती स्वयंअध्ययनाला मारक ठरत असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच, अभ्यास व असाईनमेंट पूर्ण करण्याच्या बाबतीत कॉपीची सवय विद्यार्थ्यांमध्ये बळावत चालली आहे, असे शिक्षकांचे निरीक्षण आहे. कला शाखेचे ५७, वाणिज्यचे ६१ तर विज्ञानाच्या ६८ शिक्षकांनी विद्यार्थी आपल्या असाईनमेंट कॉपी करून पूर्ण करतात असे म्हटले आहे.
श्रेयांक-श्रेणी पद्धती अयशस्वी ठरण्याचे मुख्य कारण शिक्षक-विद्यार्थी व्यस्त प्रमाणात असल्याकडे पाहणीत लक्ष वेधण्यात आले आहे. एका शिक्षकामागे ३० ते ४० विद्यार्थी असल्यास ही पद्धत परिणामकारकपणे राबविणे शक्य आहे, असे शिक्षकांचे मत आहे. पण, सध्या एका शिक्षकाला तब्बल १०० ते १२० विद्यार्थ्यांचा वर्ग सांभाळावा लागतो. इतक्या प्रचंड संख्येने विद्यार्थ्यांच्या परीक्षा, असाईनमेंट घेऊन त्या तपासणे तसेच त्यांच्या इतर अशैक्षणिक कामगिरीच्या नोंदी ठेवणे एका शिक्षकाच्या आवाक्यातली गोष्ट नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
अहवालातील इतर निष्कर्ष आणि सूचना
* कला-वाणिज्य शाखेच्या शिक्षकांचे काम प्रत्येक आठवडय़ाला १४ तासांनी तर विज्ञान शिक्षकांचे काम ११तासांनी वाढले
* कला-वाणिज्य शाखेकरिता आणखी ७०टक्के तर विज्ञानाच्या ५५टक्के शिक्षक नेमणे गरजेचे
श्रेयांक-श्रेणी पद्धतीचे फायदे-तोटे
फायदे
* वर्गातली हजेरी वाढली
* सातत्यपूर्ण मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय बळावली
तोटे
* मूल्यांकनाच्या नोंदी ठेवण्याचे काम वाढले
* अध्यापनासाठी वेळ कमी
* श्रेणी पद्धतीमुळे स्पर्धात्मकता कमी झाली
* स्वयंअध्ययनाला कमी वेळ
* शिक्षणबाह्य़ उपक्रमांना वेळ देणे कमी झाले
* कॉपी करून असायनमेंट पूर्ण करण्याचे प्रमाण वाढले