सहकार कायद्यात होऊ घातलेल्या बदलामुळे आगामी काळात स्पर्धा तीव्र होणार असून, शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, त्यादृष्टीने सर्वानी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघ व नाफेडच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी तत्त्वावर मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, येथील खरेदी व्यवहारांना कोल्हे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती उत्तमराव औताडे, उपसभापती सयाराम कोळसे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित लोहाडे, माजी सभापती संभाजी रक्ताटे, संजीवनीचे उपाध्यक्ष विलास वाबळे आदी यावेळी उपस्थित होते. कोकमठाण येथील शेतकरी विश्वनाथ रक्ताटे यांच्या मक्यास १ हजार ३७५ रुपये (प्रती क्विंटल) भाव मिळाला.
कोल्हे पुढे म्हणाले, कोपरगाव बाजार समितीची गेल्या चार वर्षांत अंतर्गत मतभेदामुळे प्रगती खुंटली आहे. हे मतभेद चार भिंतीच्या आत मिटले पाहिजे.
शेतकऱ्यांच्या संस्थेत आपण आत्तापर्यंत कधीही राजकारण आणलेले नाही व आणणारदेखील नाही. लासलगाव बाजार समितीच्या खालोखाल आपली कोपरगावची बाजार समिती होती. भुसार, कांदा, टोमॅटोचे मार्केट जोरात होते, पण आज त्याची अवस्था फारशी चांगली नाही. अर्थकारणातील त्याचे महत्व लक्षात घेऊन व्यापारी, शेतकरी, हमाल आदी घटकांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे.