नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई पालिकेतील सुमारे ५०० अधिकारी, कर्मचारी टप्प्याटप्प्याने कल्याण-डोंबिवली, मीरा भाइंदर शहरात जाणार असून सध्या मतदार यादी पडताळणीचे काम सुरू झाले आहे. पालिकेतून नुकतेच ४० कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले असून ही संख्या हळूहळू वाढणार आहे. या कर्मचारी तुडवडय़ाचा पालिका कामकाजावर परिणाम होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आता १५० कर्मचारी मागितले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पुढील ४५ दिवस राहणाऱ्या आचारसंहितेच्या काळात पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयी कामे करावी लागणार असून नवी मुंबई पालिकेकडून सध्या १५० कर्मचारी मागविण्यात आले असून बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या पडताळून पाहण्याचे काम सुरू आहे. या काळात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून टप्प्याटप्प्याने सुमारे ५०० कर्मचारी निवडणूक कामासाठी जाणार असल्याचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक मतदारसंघात या वेळी मतदार संख्या वाढली असून ऐरोली बेलापूर मतदारसंघ त्याला अपवाद नाही.
ऐरोलीत चार लाख मतदार संख्या वाढल्याचे समजते. तरुणाईने खूप मोठय़ा प्रमाणात मतदार नोंदणी केली असून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ते उत्सुक आहेत. याचबरोबर बोगस मतदारांची गच्छंती झाली आहे. काही मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. या सर्व मतदार याद्यांची तपासणी या काळात होणार आहे. नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण निवडणूक काळात कल्याण-डोंबिवली, मीरा भाइंदर या भागात पाठविले जाते तर त्या शहरातील पालिका कर्मचारी नवी मुंबईत येत असल्याचे दिसून येते.