बहुमूल्य माहिती नष्ट होण्याची भीती
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत सुरूअसलेल्या राजकीय वादाचा फटका आता महापालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयांमधील ३०० हून अधिक संगणकांना बसण्याची चिन्हे आहेत. व्हायरसपासून संगणकांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने तीनशे अ‍ॅन्टी व्हायरस कॉपीज खरेदीचा प्रस्ताव तयार केला. मात्र, स्थायी समिती अद्याप गठित न झाल्याने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. स्थायी समितीच्या विषयांवरून सर्वसाधारण न्यायालयाच्या फेऱ्यात अडकल्याने हा प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत असून संगणकातील माहिती व्हायरसमुळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
महापालिका मुख्यालय तसेच नऊ प्रभाग समिती कार्यालयांमध्ये सुमारे तीनशेहून अधिक संगणक कार्यरत आहेत. या संगणकांतील माहिती व्हायरसमुळे नष्ट होऊ नये, तसेच सर्वच संगणक सुरळीत चालावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने संगणकांना नव्याने अ‍ॅन्टी व्हायरसचे डोस पाजण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन वर्षांसाठी तीनशे अ‍ॅन्टी व्हायरस कॉपीज खरेदीचा प्रस्ताव तयार केला असून, यासाठी सुमारे नऊ लाख ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेतील स्थायी समिती अद्याप गठित झालेली नसल्याने प्रशासनाने हा प्रस्ताव १६ ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे ही सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आली. यानंतर २४ ऑगस्ट रोजी झालेली सर्वसाधारण सभा भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करासंबंधी उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीमुळे गाजली. हा विषयही तितकाच महत्त्वाचा असल्याने इंधनावरील नव्या जकात दरासोबत हा प्रस्तावही मागे पडला. त्यानंतर २७ ऑगस्टची महासभा स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरातींच्या विषयावरून तहकूब करण्यात आली. तसेच स्थायी समितीतील विषयांसदर्भात ठाणे न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने स्थायी समितीतील विषयांचा सर्वसाधारण सभेतील मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 मात्र, असे असले तरी हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतच आहे. महापालिका प्रशासनाने या पूर्वी २००९ मध्ये अशा प्रकारच्या अ‍ॅन्टी व्हायरस कॉपीज खरेदी केल्या होत्या. मात्र, त्याची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. आता हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे संगणकामध्ये व्हायरस शिरल्यास माहिती नष्ट होण्याची तसेच संगणक बंद पडून कामकाजात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.