मोबाइल हरविल्याबाबतचा दाखला देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यास ११ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रल्हाद दौलत चव्हाण असे लाचखोरीप्रकरणी सापडलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. संजोग जयप्रताप सूरतगावकर (रा. सुंदरमनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. सूरतगावकर हे सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये चढताना त्यांच्या ताब्यातील मोबाइल हरविला होता. याबाबत त्यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधून सत्य प्रतिज्ञापत्र दाखल केले व मोबाईल हरविल्याचा दाखला मिळण्यासाठी रीतसर अर्ज सादर केला होता. त्यानुसार हा दाखला देण्यासाठी पोलीस शिपाई प्रल्हाद चव्हाण याने त्यांच्याकडे दोनशेची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय दाखला देत नाही, असे म्हणून चव्हाण याने सदर दाखला सूरतगावकर यांना न देता स्वत:कडे ठेवून घेतला. त्यामुळे सूरतगावकर यांनी लाचलुपचत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात फिर्याद नोदविली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त शंकरराव चव्हाण यांच्या पथकाने लोहमार्ग पोलीस ठाण्यात सापळा रचून कारवाई केली.