कुख्यात गुंड अबू सालेम कडेकोट सुरक्षेनंतरही पळून जाईल, असे पोलिसांना वाटते का, असा सवाल करीत आपण आदेश देईपर्यंत त्याला बेडय़ा घालून न्यायालयात आणू नये, असे विशेष न्यायालयाने बुधवारी पोलिसांना बजावले.
सालेम पळून जाण्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याचे सांगत त्याला न्यायालयात बेडय़ा घालून आणले जाते. त्याला विरोध करणारा अर्ज सालेमने केला असून विशेष न्यायालयाने त्याच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे.  न्यायाधीश जी. ए. सानप यांनी पोलिसांना सालेमविरुद्ध चालविण्यात येणाऱ्या खटल्यातही म्हणावे तसे सहकार्य करीत नसल्याबाबत फटकारले. आपल्याला स्वतंत्रपणे काम करू द्या.  खटल्यात अडचणी निर्माण करून, असे बजावत सालेमचा अर्ज साधा अर्ज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.  जर भीती व्यक्त करण्यात आलेली आहे तर ती लिखित स्वरूपात का नाही, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर सालेम सात वर्षे फरारी होता आणि तो पळून जाण्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच आधारे त्याला बेडय़ा घालून न्यायालयात आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.