लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावर दरोडा व बलात्काराचा बनाव रचून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राची मंगळवारी निफाडच्या न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या घटनेचे धागेदोरे शोधताना पतीने हा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयित पती भारत धोकट्रसह त्याचा मित्र गुलाब निवृत्ती ठाकर या दोघांना अटक झाली होती. या संशयितांना मंगळवारी निफाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील कोळगाव येथील भारत धोकट्र व त्याची पत्नी शितल (२७) हे रविवारी दुचाकीने मालेगाव तालुक्यातील रावळगावजवळील जळगाव येथे गेले होते. सायंकाळी परतीच्या मार्गावर असताना हा प्रकार घडल्याचे संशयित पतीकडून आधी सांगण्यात आले होते. रात्री साडे नऊ वाजता लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावरील सातमोरीजवळ चार दरोडेखोरांनी अडविले आणि आपल्याला शस्त्रांचा धाक दाखवून पत्नीवर आळीपाळीने बलात्कार केल्याचा बनाव त्याने रचला होता. परंतु, या प्रकरणातील धागेदोरे शोधताना वेगळीच माहिती पुढे आली. तक्रारदार पती भारत धोकट्रचे पत्नीशी वारंवार वाद झाले होते. तो तिला मारहाण करत असे. या कारणास्तव ती आपल्या आईकडे गुजरातमध्ये निघून गेली. दीड वर्ष ती त्या ठिकाणी वास्तव्यास असताना धोकट्र हा तिला आणण्यासाठी गेला नाही. त्यामुळे पत्नीने गुजरात पोलिसांकडे तक्रार केली. तेथील महिला सुरक्षा कक्षाने धोकट्रला बोलावून पत्नीला पुन्हा नांदण्यास नेण्यास सांगितले. त्यानंतर पत्नी शितलला घेऊन भारत सिन्नरला आला. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने भारत धोकट्रने मित्र गुलाबच्या मदतीने पत्नीचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघा संशयितांना मंगळवारी निफाड येथील फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
बनाव रचून पत्नीची हत्या करणाऱ्यासह दोघांना पोलीस कोठडी
लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावर दरोडा व बलात्काराचा बनाव रचून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राची मंगळवारी निफाडच्या न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली
First published on: 05-02-2014 at 09:23 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news in nasik