बीड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यानंतर काँग्रेसचेच नेते व सहकारमहर्षी म्हणून परिचित असलेले रामकृष्ण बांगर, त्यांची पत्नी सत्यभामा यांच्यासह त्यांच्या दूध संघ व महात्मा फुले बँकेच्या २२ जणांविरुद्ध जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोदा पोलिसांनी तिघांना अटक केली. उर्वरित सर्व फरारी आहेत. दरम्यान, बांगर यांच्यानंतर आता आणखी कोणत्या बडय़ा नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा सहकारी बँकेकडून संस्थांच्या नावावर कर्ज घेऊन बँकेला लुटल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष सारडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेचे प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशावरून शुक्रवारी पाटोदा तालुक्यातील काँग्रेस नेते बांगर, त्यांची पत्नी सत्यभामासह त्यांच्या नेतृत्वाखालील २ संस्थांमधील २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक व मुख्य प्रवर्तक असलेल्या रामकृष्ण बांगर पाटोदा दूध संघाने जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले. मात्र, बँकेतील खाते बंद करून दुसऱ्या बँकेत खाते उघडून व्यवहार केला व जिल्हा बँकेचे १ कोटी ८१ लाख रुपये थकविले. त्यामुळे बँकेचे योगेश सानप यांच्या तक्रारीवरून बांगर, त्यांची पत्नी, दूध संघाचे व्यवस्थापक महादेव बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच रामकृष्ण बांगर यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले बँकेने जिल्हा बँकेकडून ३ कोटी रुपये घेतले. मात्र, कर्जाची परतफेड केली नाही. बँकेने नोटीस पाठविल्यानंतर बँकेच्या ठेवींमधील २ कोटी वसूल करण्यात आले. उर्वरित १ कोटी २१ लाख रुपये थकबाकी आहे. अशा प्रकारे २२ जणांविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पोलिसांनी उत्तम कदम, राम बावणे व बी. एस. डोरले या बांगर यांच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली. इतर आरोपी मात्र पसार झाले.