अपंगाची मोठय़ा प्रमाणात होणारी उपेक्षा अजूनही सुरूच असून, प्रशासनाकडून त्यांना मिळणारी वागणूकही फारसी चांगली नसल्याची खंत व्यक्त करीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. अपंगांच्या संघटनांनी त्यांच्या हक्कासाठी लढा द्यावा, या लढय़ाच्या अग्रभागी आपण स्वत: राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय तिसऱ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते तर, व्यसनमुक्त चळवळीचे आधारवड असलेले डॉ. अनिल अवचट यांच्या  अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी डॉ. आढाव बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, की अपंगाचे साहित्य चांगल्या प्रतीचे असले तरी त्यांची उपेक्षा होत असून, प्रशासनाकडूनही अपंगांना सहकार्य मिळत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंदाजपत्रकात अपंगांसाठी भरीव तरतूद करावी.
डॉ. अनिल अवचट म्हणाले, की जेव्हा जगणे असह्य होते तेव्हा लिहिलेल्या साहित्यालाच मोठी किंमत असते. अपंगत्व हे दु:ख असू शकत नाही ती ताकद असू शकते. या ताकदीमुळेच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी क्षमता निर्माण होते. अलीकडे समाजात तुटलेल्या या वर्गाला इतरांच्या दु:खाची जाणीव व्हायला हवी. समोरच्याचे दु:ख मनाला भिडण्यासाठी मन आभाळाएवढे करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीनिवास पाटील म्हणाले, साहित्य संमेलनामुळे अपंगाच्या सर्वागीण विकासाचा मार्ग प्रशस्त होईल. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा. बाळासाहेब पाटील यांनी अपंगांच्या साहित्यनिर्मितीला उंची प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमास संमेलन संयोजन समितीचे मोहनराव माळी, आनंद मोरे, सुरेखा सूर्यवंशी, विलासराव पाटील यांच्यासह साहित्यिक उपस्थित होते.
कलाकृतींच्या प्रदर्शनाला प्रतिसाद  
कराड-विटा रस्त्यावरील सप्तपदी मंगल कार्यालयाच्या आवारात तिसऱ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अपंगांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन थाटात भरविण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ास उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दर्शविला. त्यांच्याकडून अपंगांनी बनविलेल्या कलाकृतींची माहिती घेत तोंडभरून कौतुक केले गेल्याने स्वबळावर उभे राहण्याची उमेद बाळगणाऱ्या अपंग बांधवांच्या पंखात जणू बळ आल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते.