परवानगीशिवाय पत्नीचे दागिने विकणे आणि नंतर आपल्या सोयीनुसार तिला ते परत करणे ही क्रूरताच असल्याचे मान्य करीत कुटुंब न्यायालयानेमहिलेची घटस्फोटाची मागणी मान्य केली. त्यामुळे पुरुषी अधिकार गाजवत बायकोचे दागिने विकणे नवऱ्याला चांगलेच महागात पडले.
या महिलेचे २००२ मध्ये लग्न झाले होते. मात्र पतीच्या वागणुकीमुळे हे लग्न टिकवणे अशक्य होऊन बसले असल्याचा दावा करीत महिलेने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. वारंवार तिला मारहाण करायचा. या सगळ्या अत्याचाराला ती कंटाळली होती. परंतु या सर्व कारणांसोबतच आणखी एक महत्त्वाचे कारण तिने घटस्फोटाची मागणी करताना दिले होते. ते म्हणजे पतीने तिला अंधारात ठेवून तिचे दागिने परस्पर विकून टाकले. परंतु दागिने विकल्याची बाब उघडकीस आल्यानंतर तिने पतीकडे जाब विचारला असता त्याने तिला बेदम मारहाण केली.
तिच्या अर्जावर न्यायालयाने पतीला अनेकदा नोटीस बजावत आरोपांबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले. मात्र त्याच्याकडून एकदाही प्रतिसाद आला नाही. अखेर न्यायालयाने पत्नीने आपला दावा सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे तिची घटस्फोटाची मागणी मान्य केली. लग्न टिकविण्यासाठी प्रेम, विश्वास, परस्पर सामंजस्याची भावना या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पती-पत्नी दोघांनी संसार सुखाचा होण्यासाठी सारखाच प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रकरणी पतीकडून वारंवार निराशा पदरी पडत असतानाही पत्नीने लग्न टिकविण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी तिचे प्रयत्न अपुरे पडले, असे न्यायालयाने तिचा घटस्फोटाचा अर्ज मान्य करताना म्हटले. न्यायालयाने घटस्फोट मान्य करताना मुलगीही महिलेसोबतच राहील, असे स्पष्ट केले.