भाजीपाला शेतातून थेट सोसायटीत..!
नावीन्यपूर्ण पिके घेऊन दारिद्रयाचे दुष्टचक्र भेदता येऊ शकते, हे गेल्या वर्षी हळदीने दाखवून दिल्यानंतर आत्मविश्वास आलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी कृषि आणि सहकार खात्याच्या मदतीने आता थेट शेतातून शहरांमधील सोसायटीत भाजीपाला आणण्यास सुरूवात केली आहे. सोमवारपासून ठाणे, कल्याण, वसई, विरार, पालघर आदी ठिकाणी अशा प्रकारची एकूण १७ भाजीवाटप केंद्र कार्यान्वित झाली आहेत. या योजनेत ग्राहकांना त्यांच्या दारात मळ्यातली ताजी भाजी रास्त भावात मिळणार आहे. तसेच थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनाही त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळणार आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात भाजीपाल्याचे पीक घेतल्यास नाशिक-पुणेच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये कमी वेळेत आणि वाहतूक खर्चात भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो. विभागीय कृषि संचालक विजय इंगळे, जिल्हा कृषि अधिकारी रफीक नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक नितीन काळे आणि सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही कल्पना आता प्रत्यक्षात अवतरली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्य़ाच्या विविध तालुक्यांमधील ९० शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. योजना राबविण्यापूर्वी शेतकरी तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त कार्यशाळा कृषि विभागाने घेतली. त्यात दोन्ही पक्षांच्या अपेक्षा आणि गरजा विचारात घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना विपणन तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे शहरात वागळे इस्टेट, वर्तकनगर आदी परिसरातील सोसायटय़ांमध्ये थेट भाजीपाला विक्रीचे केंद्र सुरू झाली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. मिरची, टॉमेटो, मेथी, भेंडी, दुधी भोपळा अशी विविध प्रकारच्या भाज्यांचा त्यात समावेश होता.  पहिलाच दिवस असूनही अपेक्षापेक्षा लवकर माल संपल्याने शेतकरी खूश होते. आता रहिवाशांच्या सोयीनुसार आठवडय़ातून दोन दिवस हे विक्री केंद्र सुरू राहणार आहेत. तसेच स्थानिक महिला बचत गटांमार्फत भविष्यात निवडलेल्या पॅकबंद भाज्या देण्याचाही शेतकऱ्यांचा विचार आहे.