एकता कपूरसारखे डोके असलेली बाई चित्रपट निर्मितीक्षेत्रात आल्यानंतर काय काय करू शकते, याचा प्रत्यय आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटांमधून आला आहेच. एकताने ‘डर्टी पिक्चर’च्या माध्यमातून थेट सिल्क स्मिता या अभिनेत्रीच्या आयुष्यावरच प्रकाश टाकला होता. आता तिच्या ‘एक थी डायन’ या चित्रपटातही वास्तवाच्या जवळ जाणारे एक पात्र आहे. हे पात्र म्हणजे तीन ‘डायन’पैकी एक चेटकीण असून ते पात्र जुन्या काळातील एका अभिनेत्रीवर आधारित आहे. आता, ही अभिनेत्री म्हणजे कोण, याचा गौप्यस्फोट करण्याएवढी बावळट एकता नक्कीच नाही! त्यामुळे ‘कोण बरे ती जुनी अभिनेत्री?’ या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी तरी प्रेक्षक नक्कीच चित्रपटगृहात जातील.
कोणताही चित्रपट सुरू होण्याआधी, ‘या चित्रपटातील घटना आणि पात्रे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग मानावा,’ अशा धाटणीचे वाक्य दाखवले जाते. तरीही चित्रपटातील अनेक प्रसंग वास्तवातील दृष्यांशी वारंवार साधम्र्य साधतात. असाच प्रकार आता ‘एक थी डायन’मध्ये घडणार आहे. या चित्रपटातील एका ‘डायन’चे पात्र हे जुन्या अभिनेत्रीवर आधारित असून या अभिनेत्रीचाही भूत-प्रेत वगैरे गोष्टींवर विश्वास होता. याबाबत एकताला काहीच कल्पना नव्हती. मात्र दिग्दर्शक कानन अय्यर यांनी एकताला सांगितल्यानंतर तिचा विश्वासच बसत नव्हता.
अखेर एकताने याबाबत आपले वडील व ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांना विचारले. जितेंद्र यांनी एकताला त्या अभिनेत्रीचे अनेक किस्से ऐकवल्यानंतर एकताची खात्री पटली. या अभिनेत्रीने जितेंद्र यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय कपूर परिवाराबरोबर त्यांचे संबंधही खूप चांगले आहेत. त्यामुळे एकता या अभिनेत्रीचे नाव जाहीर करण्याबाबत निरुत्साही आहे. आता या चित्रपटातील कोंकणा, कल्की आणि हुमा यांच्यापैकी कोणाची भूमिका त्या अभिनेत्रीजवळ जाणारी आहे, हे पाहिल्याशिवाय ही अभिनेत्री कोण, हे कळणार नाही.