कयाधूवरील प्रस्तावित साखळी बंधारे व इतर प्रस्तावित प्रकल्पांना मान्यतेसह निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर कावड मोर्चा नेण्यात आला.
जिल्हा परिषद संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यातील कयाधू नदीवर प्रस्तावित साखळी बंधारे बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी बंधाऱ्याची गरज असल्याने या मागणीवर सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी भर दिला आहे. कयाधू नदीवर १४ बंधारे व इतर कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने तयार केला. परंतु सरकारने त्यास अजून निधी उपलब्ध करून दिला नाही. जिल्ह्यात अजून एकही मोठा प्रकल्प नसल्याने सिंचनाची टक्केवारी केवळ ६ टक्के आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यात यावेत, ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
याच मागणीसाठी शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा नेला होता. आता दुसऱ्या टप्प्यात काढलेल्या मोर्चात मडक्याची कावड खांद्यावर घेऊन लोक सहभागी झाले होते. भजनी मंडळाचा यात लक्षणीय सहभाग होता. टाळ-मृदुंगाच्या निनादात व घोषणाबाजीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. माजी आमदार दगडू गलांडे, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम, भास्करराव देशमुख, आमेर अली, प्रवीण शेळके, अप्पाराव देशमुख, श्यामराव जगताप, रामेश्वर िशदे आदींचा सहभाग होता.