विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश फुंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकीकडे निर्धार बैठकांचा धडाका लावला असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील सुंदोपसुंदी आणि मतभेदांनी टोक गाठल्याचे चित्र शनिवारी ठाण्यात दिसून आले. घोडबंदर मार्गावरील डॉ.काशीनाथ घाणेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे नाव ऐनवेळेस वक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे संपातलेल्या डावखरे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांना फैलावर घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रधान हे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे प्रधानांना फैलावर घेताना डावखरेंचा तीळपापड झाल्याचे कार्यकर्त्यांनी अनुभवले. विशेष म्हणजे, वक्त्यांची यादी आपण तयार केलीच नव्हती, असे सांगत प्रधान यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांचे समर्थक अशोक पोहेकर यांच्यावर जबाबदारी ढकलल्याने या मानापमान नाटय़ाला वेगळेच वळण लागले.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जितेंद्र आव्हाड आणि वसंत डावखरे असे सरळ सरळ दोन गट आहेत.  लोकसभा निवडणुकीत आव्हाड यांच्या गोटात सामील झालेले आनंद परांजपे यांना उमेदवारी देताना राष्ट्रवादीने डावखरे यांचा पत्ता कट केला. तेव्हापासून डावखरे-आव्हाड यांच्या समर्थकांमधील दरी आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या काही महिन्यांपासून डावखरे यांची साथ दिल्याने मध्यंतरीच्या काळात आव्हाडांना एकटे पाडण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याची आव्हाड समर्थकांची भावना आहे.
मतभेद टोकाला
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून वसंत डावखरे स्वत: इच्छुक असल्याची चर्चा असून पालकमंत्री नाईक यांनीही त्यांच्या उमेदवारीला पािठबा देऊ केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर डावखरे यांच्यासाठी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी काँग्रेस श्रेष्ठींनी दाखवली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून डावखरे पिता-पुत्रांनी ठाणे शहरात वेगवेगळ्या विकास कामांचा धडाकाच लावला आहे. या कार्यक्रमांच्या फलकांवर डावखरे समर्थक आव्हाडांना स्थान देत नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांचे मोठे फलक शहरभर लावणारे डावखरे समर्थक या फलकांवर आव्हाडांची छबी झळकणार नाही याची दक्षता घेताना दिसतात. त्यामुळे गेल्या काही काळापासून या दोन गटांमध्ये पुन्हा एकदा धुसफुस सुरू झाली आहे.
जाहिरातीच्या निमित्ताने खदखद वाढली
शनिवारी निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने ठाण्यात येणाऱ्या अजित पवार यांच्या स्वागताच्या काही जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रात झळकल्या. त्यामध्ये नाईक-डावखरे यांचे छायाचित्र झळकत असताना आव्हाडांची छबी मात्र वगळण्यात आली होती. त्यामुळे मेळाव्याच्या पूर्वीपासूनच आव्हाड समर्थकांमध्ये यासंबंधी खदखद सुरू होती. मेळाव्याला जायचेच नाही, असा सूरही यानिमित्ताने काहींनी लावला. अखेर अजित पवारांच्या स्वागतासाठी आव्हाड समर्थक काहीसे उशिरानेच पोहोचले. मेळाव्यात आव्हाड, नाईक, डावखरे, तटकरे आणि अजित पवार असा भाषणांचा क्रम ठरविण्यात आला. मात्र, ऐनवेळेस डावखरे यांचे नाव वक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले आणि एकच गहजब उडाला. मेळावा संपताच डावखरे यांनी पूर्वाश्रमीचे आव्हाड समर्थक अध्यक्ष मनोज प्रधान यांना फैलावर घेत त्यांना खडे बोल सुनावले.
डावखरे यांचा आवाज यावेळी चढल्यामुळे प्रधान यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीचे डोळे यावेळी पाणावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, ‘मी यादी तयारच केली नाही. वक्त्यांची नावे अशोक पोहेकर (नाईक समर्थक) यांनी तयार करून आणली होती’, असा खुलासा प्रधान यांनी करताच डावखरे यांची बोलतीच बंद झाली. ‘तुमचे नाव यादीतून कसे वगळले गेले ते पोहेकरांना विचारा’, असे प्रधान पुन्हा पुन्हा डावखरे यांना सांगत होते. त्यामुळे आपले नाव नेमके कुणी कापले याचा विचार करतच डावखरे यांची स्वारी कार्यक्रम स्थळाकडून निघाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Davkhare pradhan issue in ncp melava
First published on: 08-07-2014 at 06:42 IST